Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:19 IST2026-04-23T20:17:41+5:302026-04-23T20:19:00+5:30
Baramati bypoll election: बारामतीत पाच वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान

Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
बारामती - अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीसाठी पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, विरोधी उमेदवारांमध्ये एकही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याने निवडणूक पूर्णपणे एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. विरोधी उमेदवारांनी केवळ उमेदवारी कायम ठेवली, मात्र प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ८.१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के, तर ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदानाची टक्केवारी होती. ५ वाजेपर्यंत हे मतदान ५२.४४ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र, पार्थ पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती तालुक्यात माळेगावसह काही मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. तसेच जय पवार यांनी बारामती मतदारसंघात दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीवर लक्ष ठेवले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलगी रेवती, रणजित पवार, शुभांगी पवार यांच्यासह शहरातील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांचे पुत्र जय पवार यांनी जळोची येथे मतदान केले. युगेंद्र पवार, त्यांचे वडील श्रीनिवास पवार आणि मातोश्री शर्मिला पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान करण्यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले. तसेच काटेवाडी येथे अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे मतदानापूर्वी आशीर्वाद घेतले.दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा फैसला ४ मे रोजी होणार आहे. ‘रेकॉर्डब्रेक’ मतदानासाठी यंदा राष्ट्रवादीने ताकद पणाला लावली आहे. प्रखर उन्हाळा आणि एकतर्फी निवडणुकीमुळे मतदानाचे प्रमाण घटल्याचे मानले जाते.