मुंबईतील वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ यंदाच्या हंगामात पहिल्यांदा समोरासमोर आले आहेत. दोन्ही संघांनी मिळून १८ पैकी १० IPL ट्रॉफी जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला रोहित शर्माने पाच वेळा चॅम्पियन केले असून MS धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. पण यावेळी दोन्ही संघ या दिग्गजांशिवाय मैदानात उतरले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदाच असं घडलं, दोन्ही संघ दिग्गजांशिवाय उतरले मैदानात
MS धोनी हा २००८ च्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. दुसरीकडे रोहित शर्मा पहिल्या दोन हंगाात डेक्कन चार्जर्सकडून खेळल्यावर २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला. २०११ नंतर ज्या ज्या वेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना झाला त्या त्या वेळी दोघांपैकी एक तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला आहे. पण पहिल्यांदाच या दिग्गजांशिवाय दोन्ही संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
धोनीची नेट प्रॅक्टिसमध्ये झलक दिसली, पण अजूनही प्लेइंग इलेव्हनमधून आउटच
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआदीच पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी पहिल्या टप्प्यातील सामन्याला मुकणार असल्याचे समोर आले. मागील दोन सामन्याआधी या दुखापतीतून सावरुन तो नेट्समध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. त्यामुळे वानखेडेच्या हायहोल्टेज सामन्यात त्याची यंदाच्या हंगामातील पहिली झलक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण CSK संघ या सामन्यात त्याच्याशिवाय मैदानात उतला. CSK नं या सामन्यासाठी जो एकमेव बदल केला आहे त्यात सर्वात महागडा अनकॅप्ड भारतीय प्रशांत वीरची CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.
रोहित अजूनही शंभर टक्के फिट नाही?
रोहित शर्मानं यंदाच्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत दमदार सुरुवात केली होती. पण आरसीबी विरुद्धच्या सामन्यात स्नायू दुखापतीमुळे तो रिटायर्ड हर्ट होऊन परतला. धोनीप्रमाणे त्यानेही नेट्समध्ये सराव सुरु केला आहे. पण नेट्समध्ये थ्रो डाऊन दरम्यान मोठे फटकेबाजी करण्यात तो सक्षम दिसला नाही. त्यामुळेच त्याचे कमबॅक लांबणीवर पडल्याचे दिसते.