मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:30 IST2026-04-23T20:29:43+5:302026-04-23T20:30:12+5:30
पुणे नागपूर एक्सप्रेसमधील घटना : सर्व चिजवस्तू सुरक्षित, प्रवासी झाला गदगद

AI Generated Image
नागपूर : मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीची किंमती चिजवस्तू असलेली बॅग घाईगडबडीत रेल्वेगाडीत राहून गेले. मात्र, माहिती कळताच हे सामान शोधून त्या प्रवाशाला परत केले. बुधवारी ही घटना पुणे नागपूर एक्सप्रेसमध्ये घडली.
हिंगणघाट (जि. वर्धा) येथील अॅड इब्राहिम बख्श यांचे काका रहिम बख्श मध्य प्रदेशमधील सेंधवा येथे राहतात. बख्श कुटुंबातील सदस्य हज यात्रेला निघणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी रहिम बख्श भुसावळ येथून पुणे-नागपूर एक्सप्रेसमध्ये बसले. बुधवारी ते घाईगडबडीत वर्धा रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून हिंगणघाटला जात असताना त्यांना त्यांची किंमती चिजवस्तू असलेली बॅग ट्रेनमध्येच राहून गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच ॲड इब्राहिम बख्श यांना सांगितले. त्यांनी वर्धा स्थानकावरील रेल्वे पोलिसांच्या मदतीने ही माहिती नागपूर रेल्वे कंट्रोलला कळविली.
त्यानुसार, गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांनी बॅगची शोधाशोध करून ती ताब्यात घेतली. तसा निरोप बख्श यांना देण्यात आला. त्यानुसार, बख्श यांचे नातेवाईक तातडीने नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी बॅगची ओळख पटवून आतमधील साहित्य जैसे थे असल्याचे सांगितले. यानंतर कायदेशीर औपरचारिकता पूर्ण करून बख्श यांना त्यांची बॅग परत करण्यात आली.
... म्हणून मिळाली बॅग
रेल्वेत हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या सामानाची तक्रार वजा माहिती प्रत्यक्ष रेल्वे कर्मचारी किंवा १३९ या हेल्पलाईन नंबरवर तातडीने कळविली तर रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलिसांना ते शोधून काढणे अधिक सोपे होते. उशिर झाल्यास ते सामान मिळवण्याची प्रक्रिया किचकट आणि विलंबाची होते. त्यामुळे असे काही झाल्यास तातडीने रेल्वेचे कर्मचारी, रेल्वे मदत अॅप किंवा हेल्पलाईन नंबर वर प्रवाशांनी तातडीने संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.