जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:21 IST2026-04-23T15:19:58+5:302026-04-23T15:21:08+5:30
Global Energy Crisis : IEA प्रमुख फातिह बिरोल यांनी जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती ४% वाढल्या असून हॉर्मुझ सामुद्रधुनीतील माईन्स काढण्यास ६ महिने लागण्याची शक्यता आहे.

जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
इराण युद्धाच्या परिणामांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प झाला असूम वाढत्या किमतींमुळे इंधनाच्या मागणीवर मोठा ताण येईल आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा IEA चे प्रमुख फातिह बिरोल यांनी 'रॉयटर्स'शी बोलताना दिला आहे.
अमेरिका आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास नकार दिल्याने गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत हा जलमार्ग बंदच राहील. यामुळे ब्रेंट क्रूड ३.६२% वाढीसह १०५.६३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. तर WTI क्रूड ४.०६% वाढीसह ९६.७३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले.
होर्मुझमधून इराणची पहिली 'टोल' वसुली
धक्कादायक बाब म्हणजे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई यांनी माहिती दिली की, या टोलमधून मिळालेला पहिला महसूल इराणच्या सेंट्रल बँकेत जमा करण्यात आला आहे.
होर्मुझमधील सुरुंग काढण्यास ६ महिने लागणार?
पेंटागनच्या अंदाजानुसार, इराणने होर्मुझमध्ये पेरलेल्या समुद्री सुरुंग साफ करण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. अमेरिकन खासदारांच्या गुप्त बैठकीत ही माहिती देण्यात आली असून, इराणविरुद्धच्या युद्धाची नेमकी रणनीती आणि उद्दिष्टांबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
युरोपवरही युद्धाची सावली
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी चेतावणी दिली आहे की, या युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित नसून तो युरोपपर्यंत पोहोचला आहे. युरोप आधीच महागाई आणि ऊर्जा टंचाईशी झुंजत असताना, या संघर्षामुळे तेथील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.