"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:21 IST2026-04-23T16:18:18+5:302026-04-23T16:21:32+5:30
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Death: बारामती पोटनिवडणुकीत मतदान केल्यावर मांडले मत

"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Death: अजित पवार विमान अपघात प्रकरणाबाबत अद्यापही चर्चा रंगली आहे. यावर विविध नेतेमंडळी व्यक्त होत आहेत. "महाराष्ट्र सरकारने अजितदादा पवार अपघात प्रकरणी उशिरा का होईना एफआयआर दाखल करायला पाहिजे होता. काँग्रेस सरकार असलेल्या राज्याने अजितदादा पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांच्या प्रयत्नाने एफआयआर दाखल करत अजितदादा पवारांना न्याय दिला. रोहित पवारांच्या प्रयत्नांचे महत्त्व काँग्रेसने समजले. ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा एफआयआर होत नाही हे दुर्दैवी आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली. बारामती पोटनिवडणुकीत मतदान केल्यानंतर त्यांनी हे सूचक विधान केले.
पोटनिवडणूक लावण्याबाबतही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केले. "अजित पवारांना जाऊन तीन महिने देखील झाले नाही आहे आणि ही पोटनिवडणूक लागली ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज आम्ही सर्व मतदानासाठी आलेलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो अधिकार दिला आहे, एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण केल पाहिजे. मोठ्या संख्येने दादांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्वांना करते", अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल...
"बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदान कराव अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खूप इच्छा होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मतदानाला येता आले नाही. उन्हाळा खूप असल्याने प्रवास करू नये असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो," असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
मुंबई मोर्चा प्रकरणाबद्दल...
मुंबईतील भाजप मोर्चा प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण ते करत असताना सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांची गैरसोय केल्याने नागरिकांमध्ये संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ता अडवून आंदोलन करण्यावर त्यांनी आत्मचिंतन करावे.आंदोलन करायच होते तर तिथे एक मैदान आहे, त्या ठिकाणी करता आले असते. आम्ही आंदोलने करतो तेव्हा आम्हाला जागा निश्चित करून दिली जाते, मग सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना दुसरा न्याय कसा?" असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारले.
विरोधकांची एकजूट!
"पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यंत्रणेच्या विरोधात ज्या प्रकारे लढत आहेत, त्याच बरोबर स्टॅलिन सुद्धा या यंत्रणेच्या विरोधात लढत आहेत. दिल्लीवरुन ज्या यंत्रणेच्या वापर करत विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि स्टॅलिन लढताना दिसून येत आहेत. त्या राज्यावर जो अन्याय झाला आहे, त्याविरोधात ही राज्ये लढत आहेत. आता जे दिसतंय त्यावर असे वाटते की केरळमध्ये काँग्रेसचे सरकार येईल. तामिळनाडूमध्ये डीएमकेचा मुख्यमंत्री बसेल. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार पुन्हा येईल. तर आसाममध्ये काँग्रेसने भाजपला टफ फाइट दिली आहे," असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.