Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:18 IST2026-04-23T18:17:37+5:302026-04-23T18:18:15+5:30
Donald Trump And Dhakshineswar Suresh : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक केलं आहे.

Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये जन्मलेला टेनिसपटू दक्षिणेश्वर सुरेश याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयटेनिसपटूचं भरभरून कौतुक केलं आहे.
२६ वर्षीय दक्षिणेश्वर सुरेश हा २०२५ च्या NCAA (नॅशनल कॉलेजिएट ॲथलेटिक असोसिएशन) चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघांचा भाग होता. याच निमित्ताने बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
"डीके सुरेशने TCU विरुद्धच्या अंतिम सामन्यात निर्णायक गुण मिळवून 'वेक फॉरेस्ट' (Wake Forest) संघाला ४-२ असा विजय मिळवून दिला. “मी तुझे मनापासून अभिनंदन करतो" असं ट्रम्प यावेळी म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, "जेव्हा मी विचारलं की, या संघातील सर्वोत्तम खेळाडू कोण आहे? तेव्हा सर्वांनी त्याच्याकडे (दक्षिणेश्वरकडे) बोट दाखवलं. अभिनंदन डीके, तू जे केले आहेस ते खरोखरच अविश्वसनीय आहे. तुझं हे वर्ष खूप छान गेलं."
या समारंभात ट्रम्प यांनी २०२५ च्या विविध क्रीडा प्रकारातील NCAA चॅम्पियन संघांचा गौरव केला. यामध्ये वेक फॉरेस्ट विद्यापीठाचा टेनिस संघ, ओक्लाहोमा स्टेटचे गोल्फ खेळाडू, टेक्सास ए अँड एमचा महिला व्हॉलीबॉल संघ आणि इतर अनेक खेळाडूंचा समावेश होता.
मूळचा तामिळनाडूचा असलेला दक्षिणेश्वर सुरेश हा माजी भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मनच्या सल्ल्याने अमेरिकेला गेला. स्कॉलरशिपच्या मदतीने त्याने अमेरिकेच्या कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि सध्या तो 'वेक फॉरेस्ट' विद्यापीठाकडून खेळतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला ३-२ ने हरवलं होतं, त्या विजयातही दक्षिणेश्वरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.