Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:04 IST2026-04-23T11:55:43+5:302026-04-23T12:04:09+5:30
Divyanka Sirohi : लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री राहत्या घरी अचानक बेशुद्ध पडली आणि २१ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. ती केवळ ३० वर्षांची होती.

दिव्यांकाच्या मृत्यूची माहिती तिची बहीण आरतीने दिली. तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दिव्यांका सिरोहीला हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घटना गाझियाबादमधील 'राज नगर एक्स्टेंशन' येथील दिव्यांकाच्या राहत्या घरी घडली. तिची प्रकृती अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी ज्या दिवशी दिव्यांकाचा मृत्यू झाला, त्या दिवशी ती पूर्णपणे नॉर्मल होती. तिची प्रकृतीही ठीक होती. तिने आपल्या भावासोबत जेवणही केलं होतं.

दिव्यांकाने त्यावेळी आपली तब्येत थोडी ठीक नसल्याचं आणि अस्वस्थ वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिचा भाऊ कामासाठी बाहेर गेला आणि त्याने दिव्यांकाला घराचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं.

दिव्यांकाने भावाला 'ओके' असं उत्तरही दिलं होतं. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यही घरी नव्हते. जेव्हा ते घरी परतले, तेव्हा दिव्यांका मृत अवस्थेत आढळली. तिचं शरीर ताठ झालं होतं आणि अंगावर थोडी सूजही होती.

दिव्यांकाला नेमकं काय झालं होतं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सध्या तरी हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, मात्र मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दिव्यांकाचा जन्म १९९६ मध्ये यूपीच्या बुलंदशहरमध्ये झाला होता. सध्या ती आपल्या भावंडांसोबत गाझियाबादमध्ये राहत होती. दिव्यांकाने बीसीए (BCA) पदवी घेतली होती, पण तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

करिअरच्या सुरुवातीला ती टिकटॉकवर व्हिडीओ बनवत असे. तिचा 'मेरी मम्मी नू पसंद नहीं' या गाण्यावरील डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि तिथूनच तिचे नशीब पालटलं. त्यानंतर तिने चित्रपट, गाण्यांमध्ये काम करून स्वतःची ओळख निर्माण केली होती.

दिव्यांकाची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट आता तुफान व्हायरल होत आहे, जी पाहून चाहत्यांचे मन सुन्न झालं आहे. २०२३ मध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, जी तिने आपल्या प्रोफाइलवर 'पिन' करून ठेवली होती.

फोटोमध्ये दिव्यांकाने निळ्या रंगाचे जॅकेट घातलं असून डोक्याला फेटा बांधला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'शिव, मला तुझ्यासोबत घेऊन चल.' ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर सर्वात वर असल्याने चाहते तीच तिची शेवटची इच्छा मानत आहेत.

या पोस्टवर कमेंट्स करत चाहते शोक व्यक्त करत आहेत. काही युजर्सनी "आजकाल तरुणांना हार्ट अटॅक का येत आहेत?" असा सवालही उपस्थित केला आहे. अवघ्या तिसाव्या वर्षी जग सोडून गेल्यामुळे तिचे चाहते अत्यंत दुःखी आहेत.

















