भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:25 IST2026-04-23T13:24:37+5:302026-04-23T13:25:17+5:30
West Bengal Election 2026 voting updates: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान शुभेंदू सरकार आणि हुमायून कबीर यांच्यावर हल्ले झाले. सिलीगुडीत भाजप-TMC मध्ये राडा झाला असून ११ वाजेपर्यंत विक्रमी मतदान नोंदवण्यात आले आहे.

भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान आज अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. दक्षिण दिनाजपूर, मुर्शिदाबाद आणि सिलीगुडीमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव वाढला आहे. असे असूनही, सकाळी ११ वाजेपर्यंत बंगालमध्ये ४१.११% तर दुपारी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे.
कुमारगंजमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला
दक्षिण दिनाजपूरमधील कुमारगंज विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार शुभेंदू सरकार यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. एका बूथवर 'बूथ जॅमिंग' होत असल्याची माहिती मिळाल्यावर सरकार तिथे पोहोचले असता, त्यांना बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मूकदर्शक बनून हा प्रकार पाहिल्याचा गंभीर आरोप शुभेंदू सरकार यांनी केला आहे.
हुमायून कबीर यांच्या गाडीवर दगडफेक
मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराचे तांडव सुरूच असून रेजीनगर येथील AJUP उमेदवार हुमायून कबीर यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला. आंदोलकांनी त्यांच्या कारला घेरून लाठ्या-काठ्यांनी आणि विटांनी हल्ला केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिलीगुडीत भाजप-TMC आमनेसामने
सिलीगुडीतील जगदीश चंद्र विद्यापीठ येथील मतदान केंद्राबाहेर भाजप आणि TMC कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी भाजप उमेदवार शंकर घोष घटनास्थळी उपस्थित होते. वाद वाढत गेल्याने दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की सुरू झाली, मात्र केंद्रीय सुरक्षा दलाच्या (CAPF) जवानांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमावाला पांगवले आणि मोठी दुर्घटना टळली.