उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:05 IST2026-04-23T17:05:17+5:302026-04-23T17:05:45+5:30
Ulhasnagar Municipal Corporation politics : उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे सेनेतील वाद टोकाला पोहोचला आहे. आयुक्त कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवकांचा धिंगाणा, महापौर पतीवर आरोप आणि राष्ट्रगीताचा अवमान; वाचा उल्हासनगरमधील राजकीय पेच.

उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका महासभा संपल्यानंतर आयुक्ताना भेटण्यासाठी गेलेले भाजपाचे गटनेता राजेश वधारिया यांना एन्ट्री देऊन सोबत असलेल्या पक्षाच्या नगरसेवकाना बाहेर थांबविले. मात्र त्या पाठोपाठ शिंदेसेनेचे गटनेते अरुण अशान यांच्या सोबत महापौर पती कमलेश निकम यांना एन्ट्री दिल्याचा राग भाजप नगरसेवकांना येऊन त्यांनी धिंगाणा घालत महापौर पतीला टार्गेट केले आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजप व शिंदेसेनेची महायुती असताना त्यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. गेल्या महासभेत लाडकी विध्यार्थिनी योजनेला भाजपाने सुचविलेले ज्योतीबाई फुले यांचे नाव डावलून माजी आमदार ज्योती कलानी यांचे नाव देण्यात आले. यावरून दोन्ही पक्षातील वाद समोर आला होता. बुधवारी भाजपाच्या नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर डम्पिंग हटाव प्रकरणी महापौरचा रस्ता अडवत महासभेत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनावरून दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आले. तर महासभा संपण्यापूर्वी महापौर अश्विनी निकम यांनी विरोधी बाकावरील एकमेव काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांना विरोधी पक्ष नेते पदी घोषित केले. आम्हाला विश्वासात न घेता शिंदेसेना परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळी भाजप नगरसेवकांनी केला.
महापालिका महासभा संपल्यानंतर भाजपाचे गटनेते राजेश वधारिया हे पक्षाच्या काही नगरसेवकासह आयुक्त मनिषा आव्हाळे यांना भेटण्यासाठी गेले. मात्र सुरक्षारक्षकांनी फक्त वधारिया यांना एन्ट्री देऊन इतर नगरसेवकांना बाहेर थांबाविले. मात्र त्यापाठोपाठ शिवसेना गटनेते अरुण अशांन हे महापौरांचे पती कमलेश निकम यांच्यासह आयुक्ताना भेटण्यास गेले. महापौरांचे पती नगरसेवक नसताना व इतर पदे त्यांच्याकडे नसताना त्यांना जाऊ का दिले? असा प्रश्न व भाजप नगरसेवकानी करीत आयुक्त कार्यालया बाहेर धिंगाणा घालत निकम यांना बाहेर काढण्याची मागणी केली. अखेर पोलीस संरक्षणात कमलेश निकम यांना बाहेर काढले.
महापौरांची प्रतिनिधी म्हणून गेलो
शिंदेसेनेचा कार्यकर्ता व महापौर अश्विनी निकम यांचा प्रतिनिधी म्हणून आयुकाकडे गेलो होतो. मात्र भाजपाने त्याचा अपप्रचार केला असून झालेला प्रकार पक्ष नेतृत्वाकडे मांडणार आहे.
- कमलेश निकम, महापौरांचा पती
महापौराकडून राष्ट्रागीताचा केला अपमान
महासभा संपल्याचे जाहीर केल्यावर, राष्ट्रगीत गायनास सुरवात झाली. यावेळी महापौर अश्विनी निकम हसत होत्या. असा आरोप भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांच्यासह अन्य भाजपा नगरसेवाकांनी केला.
- राजेश वधारिया, भाजपा गटनेता महापालिका