इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 17:27 IST2026-04-23T17:24:52+5:302026-04-23T17:27:40+5:30
अमेरिका-इराण शांतता करारासाठी पाकिस्तानची मध्यस्थी अपयशी. तेहरानने पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास दिला नकार!

इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता...
अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करारासाठी मध्यस्थी करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग लागला आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी स्वतः तेहरानला जाऊन ४८ तास मुक्काम केला, तरीही इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थीवर विश्वास दाखवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या भूमिकेमुळे पाकिस्तान आणि विशेषतः जनरल मुनीर यांच्या मुत्सद्देगिरीला मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानवर अविश्वास का?
इराणच्या अविश्वासामागे तीन प्रमुख कारणे समोर येत आहेत:
१. दुटप्पी भूमिका: युद्धजन्य परिस्थितीत जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले, तेव्हा पाकिस्तानने इराणच्या समर्थनार्थ चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तान अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा संशय इराणला आहे.
२. सौदी आणि अमेरिकेचे हितसंबंध: इराणच्या माजी उपराष्ट्रपतींच्या मते, ज्या देशाला सऊदी अरेबियाकडून निधी मिळतो आणि जो देश अमेरिकेकडून शस्त्रे विकत घेतो, तो देश निष्पक्ष मध्यस्थ कसा असू शकतो? पाकिस्तानची अमेरिकेला मदत करण्याची इतिहासकालीन पार्श्वभूमी इराणला माहीत आहे.
३. सुरक्षेची हमी नाही: अटलांटिक कौन्सिलच्या तज्ज्ञांच्या मते, उद्या जर अमेरिकेने केलेला करार मोडला, तर पाकिस्तान अमेरिकेविरुद्ध उभा राहू शकणार नाही, हे इराण ओळखून आहे.
मुनीर यांची 'मिलिटरी डिप्लोमसी' फेल
जनरल आसिम मुनीर यांनी ही चर्चा यशस्वी करण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती. लष्करी गणवेशात तेहरानला जाऊन त्यांनी जी कूटनीती आखली, तिला चीनच्या मौनामुळे आणखीनच खिळ बसली आहे. याआधी चीनच्या सांगण्यावरून इराणने इस्लामाबादला प्रतिनिधी पाठवले होते, परंतु यावेळी चीननेही या प्रक्रियेपासून सुरक्षित अंतर राखले आहे.
बैठक स्थळ बदलण्याची शक्यता
आता अमेरिका आणि इराण यांच्यातील ही प्रस्तावित बैठक इस्लामाबादमध्ये न होता, दुसऱ्या एखाद्या तटस्थ ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी नामुष्कीसारखी मानली जात आहे. मुनीर यांनी अमेरिकेला या आठवड्यात करार पूर्ण होण्याची ग्वाही दिली होती, परंतु इराणच्या 'नो-शो'मुळे संपूर्ण कूटनीतिक गणित चुकले आहे. आता पाकिस्तानला बाजूला सारून ही चर्चा पुढे सरकणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.