Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:31 IST2026-05-07T09:25:07+5:302026-05-07T09:31:11+5:30
who is Chandranath Rath: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर रक्तपात सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल पाच जणांच्या हत्या केल्या गेल्या. भाजपाचे महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचीच हत्या करण्यात आल्याने हिंसेची तीव्रता आणखी वाढली आहे.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले भाजपाचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाचीच हत्या करण्यात आली. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मध्यग्राममध्ये बुधवारी (६ मे)रात्री ही घटना घडली. या घटनेने बंगालमधील राजकीय हिंसाचार आणखी तीव्र झाला आहे.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येबद्दल बोलताना आमदार सुवेंदू अधिकारी यांनी ही राजकीय हत्याच आहे. दोन-तीन दिवस चंद्रनाथ रथ यांची रेकी केली गेली. कट रचून त्यांना मारण्यात आले, असे म्हटले आहे.

चंद्रनाथ रथ यांनी सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्यापूर्वी हवाई दलातही सेवा केली आहे. हवाई दलात नोकरी करत असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले होते.

नंतर चंद्रनाथ रथ हे राजकीय समन्वय आणि प्रशासकीय कामे करु लागले. २०१९ मध्ये जेव्हा सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असतानाच चंद्रनाथ रथ हे त्यांच्या टीममध्ये सामील झाले होते. सुरुवातीला त्यांनी मंत्रालयील जबाबदाऱ्या सांभाळल्या.

चंद्रनाथ रथ यांचे कुटुंबीय आधीपासूनच तृणमूल काँग्रेसशी जोडलेले होते. सुवेंदू अधिकारी यांनी पक्षांतर केल्यानंतर ते भाजपाशी जोडले गेले. चंद्रनाथ रथ हे जवळपास वीस वर्षांपासून अधिकारी यांच्यासोबत काम करत होते.

















