पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:58 IST2026-05-07T08:57:30+5:302026-05-07T08:58:04+5:30
Shubhendu Adhikari PA Chandranath Rath Murder Case: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून त्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव होऊन भाजपाला बहुमत मिळाल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची निर्घृणपणे हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून त्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा पराभव होऊन भाजपाला बहुमत मिळाल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयांची जाळपोळ, मोडतोड यांसह हत्येच्याही घटना घडत असून, बुधवारी रात्री भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची निर्घृणपणे हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आता चंद्रनाथ कर यांच्या हत्येचा तपास पोलिसांनी सुरू केला असून,प्राथमिक तपासामधून या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची नियोजनबद्धरीत्या हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रनाथ कर यांच्या कारचा पाठलाग दोन वाहनांकडून सुरू होता. त्यात एक कार आणि एका दुचाकीचा समावेश होता. या कारने काही वेळाने चंद्रनाथ कर यांच्या कारला ओव्हरटेक केलं. त्यामुळे चंद्रनाथ कर यांच्या चालकाला कारचा वेग कमी करावा लागला.त्यानंतर काही क्षणांतच दुचाकीवरील हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. यातील तीन गोळ्या चंद्रनाथ कर यांच्या छाती, पोट आणि डोक्यात लागल्या. दरम्यान, भाजपा नेते सुकांता मजुमदार यांनी चंद्रनाथ कर यांच्या छातीतून पाच गोळ्या काढल्या अशी माहिती दिली.
दरम्यान, या हत्याकांडाबाबत पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सिद्धार्थनाथ गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित एका वाहनाला रोखण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, कारच्या नंबर प्लेटसोबत छेडछाड करण्यात आली होती. आम्ही गाडी जप्त केली आहे. त्यामध्ये वापरलेली काडतूस आणि काही गोळ्या सापडल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही चित्रिकरणाची पडताळणी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.