सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:06 IST2026-05-07T09:03:54+5:302026-05-07T09:06:16+5:30
हे संकट थेट डोळ्यांना दिसत नसले तरी ते आतून जीवनचक्र पोखरत आहे. हवा, पाणी आणि अन्नामध्ये मिसळलेली कीटकनाशके आणि ‘फॉरेव्हर केमिकल्स’चा थेट परिणाम प्रजनन संस्थेवर होत असून, वाढते तापमान या धोक्याला अधिक तीव्र करीत आहे.

सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
लंडन : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाचा पाया असलेली ‘प्रजनन क्षमता’ सध्या एका अदृश्य जाळ्यात अडकत चालली आहे. केवळ मानवच नाही, तर पशू-पक्षी आणि सागरी जीवदेखील ‘सायलेंट फर्टिलिटी क्रायसिस’चा (मौन प्रजनन संकट) सामना करीत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
हे संकट थेट डोळ्यांना दिसत नसले तरी ते आतून जीवनचक्र पोखरत आहे. हवा, पाणी आणि अन्नामध्ये मिसळलेली कीटकनाशके आणि ‘फॉरेव्हर केमिकल्स’चा थेट परिणाम प्रजनन संस्थेवर होत असून, वाढते तापमान या धोक्याला अधिक तीव्र करीत आहे.
मानवासाठी धोक्याची घंटा
मानवामध्ये या संकटाची लक्षणे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मानवी अंडकोष आणि वीर्यामध्ये ‘मायक्रोप्लास्टिक’चे अंश आढळले असून, ज्यामुळे शुक्राणूंची गतिशीलता कमी होत आहे. याशिवाय, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे अतिसेवन पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढवत आहे, तर महिलांमध्ये भ्रूणाच्या सुरुवातीच्या विकासाचा वेग मंदावत आहे.
कृत्रिम रसायनांचे अदृश्य जाळे
जगभरात सध्या सुमारे १.४ लाख कृत्रिम रसायने अस्तित्वात आहेत, ज्यापैकी १,००० हून अधिक रसायने ‘एंडोक्राइन-डिस्टरप्टिंग’ श्रेणीतील आहेत. ही रसायने शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची नक्कल करून चयापचय आणि प्रजनन प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.
पशू-पक्ष्यांवरही संकट
ग्रीन सी टर्टल : वाढत्या तापमानामुळे कासवांच्या लिंग गुणोत्तरामध्ये बिघाड झालाय, जन्माला येणारी अधिक पिल्ले ही मादी आहेत.
पेरेग्रिन फाल्कन : डीडीटी सारख्या कीटकनाशकांमुळे या पक्ष्यांच्या अंड्यांची टरफले इतकी पातळ झाली आहेत की, ती उबवण्यापूर्वीच फुटू लागली आहेत.
मासे आणि गोगलगाय : पाण्यातील रसायनांमुळे या जिवांच्या प्रजनन अवयवांचा अप्राकृतिक विकास होत असून, यामुळे संपूर्ण प्रजातीच वंध्यत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.