हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:53 IST2026-05-07T08:53:27+5:302026-05-07T08:53:50+5:30
अभिनेत्रीची वेदनादायी कहाणी, पतीने केला कौटुंबिक हिंसाचार; मुलांना भेटूही देईना; ऑस्ट्रियात लढतेय घटस्फोटाची केस

हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सेलिना जेटली सध्या आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती युएईमध्ये अडकलेल्या आपल्या भावासाठी कायदेशीर लढा देत होतीच, मात्र आता पती पीटर हागसोबतचा घटस्फोट आणि मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी सुरू असलेला तिचा संघर्ष अधिक वेदनादायी वळणावर पोहोचला आहे. नुकतीच ती ऑस्ट्रियामध्ये घटस्फोटाच्या सुनावणीसाठी गेली होती. मात्र पतीने मुलांना अज्ञात ठिकाणी ठेवलं असून तिला मुलांना भेटूच दिलं नाही. अखेर ती तिच्या शमशेर या मृत पावलेल्या मुलाच्या कबरीवर गेली आणि तिथे जाऊन तिथे हंबरडा फोडला. सेलिनाचा हा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
सेलिना जेटलीने नुकताच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ऑस्ट्रियात आपला मृत मुलगा शमशेर याच्या कबरीवर बसून ढसाढसा रडताना दिसत आहे. ती तिथे स्वच्छता करत फूलंही अर्पण करत आहे. यासोबत तिने लिहिले, "एक आई म्हणून माझा हा वेदनादायी प्रवास जगासमोर आणण्यासाठी या हृदयद्रावक व्हिडिओशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. गेले काही आठवडे माझ्या आयुष्यातील अत्यंत कठीण होते. मी माझ्या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी ऑस्ट्रियामध्ये होते...ऑस्ट्रियाच्या न्यायाधीशांसमोर दिलेल्या हमीनंतरही, माझ्या मुलांना ज्या अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते, तिथून त्यांना पुन्हा आमच्या ऑस्ट्रियातील घरी आणले गेले नाही. मी ज्या एका मुलाला भेटू शकले, तो म्हणजे माझा मुलगा शमशेर, ज्याचे काही काळापूर्वी निधन झाले आहे.
"ही एका अशा आईची हृदयद्रावक कहाणी आहे, जिने आपल्या मुलांच्या जन्माच्या दिवसापासून त्यांच्यासाठी सर्व काही केले. मी माझा देश सोडला, आईवडिलांपासून दूर गेले, माझे काम सोडले आणि केवळ माझ्या पतीच्या करिअरला साथ देण्यासाठी मी भारत ते दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रिया आणि पुन्हा दुबई ते ऑस्ट्रिया असा सतत प्रवास केला. त्याच्या महत्त्वाकांक्षा, त्याची बदली, त्याची स्वप्ने आणि आम्ही मिळून उभं केलेलं आयुष्य, या सगळ्यात मी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिले आणि एकटीने माझ्या मुलांचा सांभाळ केला. माझ्या लग्नाप्रती आणि मुलांप्रती असलेल्या निष्ठेच्या बदल्यात, माझी मालमत्ता तुकड्या-तुकड्यात माझ्याकडून हिरावून घेतली गेली... मी अत्याचार सहन केले. कायदेशीररित्या आणि प्रामाणिकपणे परस्पर संमतीने वेगळे होण्याचे वारंवार प्रयत्न करूनही, प्रत्येक विनंतीला अवास्तव मागण्यांनी उत्तर दिले गेले, ज्या केवळ लग्नापूर्वीच्या माझ्या उरल्यासुरल्या मालमत्तेवर डोळा ठेवून होत्या.
"जॉइंट कस्टडी आणि ऑस्ट्रियाच्या कौटुंबिक न्यायालयाचा आदेश असूनही, सध्या मला माझ्या ३ मुलांशी कोणताही संवाद साधू दिला जात नाहीये आणि मी पूर्णपणे खचले आहे. मुलांपर्यंत पोहोचण्याच्या माझ्या हक्कात वारंवार अडथळे आणले गेले आहेत. त्यांना निवडक माध्यमांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, ज्यामुळे आमच्यातील संवाद खंडित झाला आहे. इतकेच नाही तर, मुलांचे ब्रेनवॉश केले जात आहे आणि त्यांना त्यांच्या आईच्या विरोधात बोलण्यासाठी धमकावले जात आहे. त्या आईच्या विरोधात, जिने मुलांच्या जन्मापासून त्यांची काळजी घेण्याशिवाय काहीही केले नाही आणि वडिलांच्या करिअरसाठी एका देशातून दुसऱ्या देशात भटकत राहिली. सप्टेंबरच्या सुरुवातीला, लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाचे गिफ्ट आले आहे असे सांगून पतीने मला पोस्ट ऑफिसमध्ये नेले आणि तिथे मला घटस्फोटाची नोटीस बजावण्यात आली. मी केवळ मुलांच्या कल्याणाला प्राधान्य देऊन नेहमीच सामंजस्याने वेगळे होण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझ्या या प्रयत्नांना नेहमीच माझ्या मालमत्तेशी संबंधित मागण्या आणि अशा अवास्तव अटींनी उत्तर दिले गेले, ज्यांचा उद्देश घटस्फोटानंतरही माझे स्वातंत्र्य आणि सन्मान हिरावून घेण्याचा आहे."
सेलिनाने काही महिन्यांपूर्वीच पीटर हागवर अत्यंत खळबळजनक आरोप केले होते. तिने ५० कोटींची भरपाई आणि १० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे. पीटरने आपल्याला अनैसर्गिक संबंधांसाठी भाग पाडल्याचा, ब्लॅकमेल केल्याचा आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला होता.
सेलिना आणि पीटर यांचा विवाह २०११ मध्ये झाला होता. २०१२ मध्ये त्यांना जुळी मुले झाली, तर २०१७ मध्ये पुन्हा दोन जुळी मुले जन्माला आली होती. मात्र, त्यापैकी शमशेर या लहान मुलाचा जन्मानंतर काही काळातच हृदयविकाराने मृत्यू झाला होता. सध्या सेलिना आपल्या तीन मुलांच्या ताब्यासाठी आणि न्यायासाठी कायदेशीर लढा देत आहे.