तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:31 IST2026-05-07T08:46:49+5:302026-05-07T09:31:48+5:30
AIADMK मधील अंतर्गत घडामोडींच्या आणि असंतोषाच्या बातम्या येत असतानाच ही नवी बातमी समोर आली आहे.

तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निकालात अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला असला तरीही बहुमतासाठी त्यांना आणखी १० जागांची गरज आहे. विधानसभेत बहुमताचा ११८ गाठण्यासाठी तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग आला आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या ५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या पाठबळामुळे टीव्हीकेची संख्या ११३ पर्यंत पोहचली आहे. अभिनेता थलापती विजय याने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु ११८ चे बहुमत मिळवण्यासाठी टीव्हीकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
टीव्हीकेने त्यांच्या १०८ आमदारांना चेंगलपट्टूच्या एका हॉटेलमध्येच थांबवले आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार दाट शक्यता आहे. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात अण्णा द्रमुक पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्सला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार AIADMK चे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार आणि पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय सी.व्ही. षण्मुगम यांनी पुदुचेरी येथे एका हॉटेलमध्ये २० खोल्या बुक केल्या आहेत. पक्षाकडून सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण वाटाघाटींच्या काळात आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याच्या उद्देशाने अनेक आमदार आधीच पुदुचेरी येथे पोहोचले आहेत तर इतर काहीजण वाटेवर आहेत.
AIADMK मधील अंतर्गत घडामोडींच्या आणि असंतोषाच्या बातम्या येत असतानाच ही नवी बातमी समोर आली आहे. AIADMK च्या आमदारांचा एक गट विजय यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. TVK हा पक्ष १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांच्या बहुमताचा आकडा गाठण्यात ते अजूनही कमी पडत आहे. या घडामोडींमध्ये आणखी भर पडली जेव्हा DMK ने आपला जुना प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या AIADMK सोबत पडद्याआड चर्चा सुरू केल्याचे वृत्त समोर आले. सध्या दोन्ही पक्षांकडील जागांची संख्या अगदीच काठावरची डिएमकेकडे ५९ आणि AIADMK कडे ४७ जागा आहेत. परंतु AIDMK चे २८ आमदार षण्मुगम यांच्या नेतृत्वात एकवटल्याचे दिसून येते.