पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:50 IST2026-05-06T09:50:15+5:302026-05-06T09:50:45+5:30
US Peshawar Consulate Closed: सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने पाकिस्तानच्या पेशावरमधील आपले वाणिज्य दूतावास कायमचे बंद केले आहे.

पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
अमेरिकेने पाकिस्तानात एक अत्यंत मोठे कूटनीतिक पाऊल उचलले असून, पेशावर येथील आपले वाणिज्य दूतावास पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा निर्णय अचानक नसून, तो टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या निर्णयाची माहिती दिली. "आमच्या मुत्सद्दींचे आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेशावर आणि परिसरातील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी आम्ही कोणतीही तडजोड करू शकत नाही," असे अमेरिकेने ठणकावून सांगितले आहे.
आता इस्लामाबादवरून होणार कामकाज
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्व कूटनीतिक आणि राजकीय कामकाजाची जबाबदारी आतापर्यंत पेशावर दूतावासाकडे होती. मात्र, आता हे सर्व कामकाज थेट इस्लामाबादमधील मुख्य अमेरिकन दूतावासातून हाताळले जाईल. संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची जोखीम कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
द्विपक्षीय संबंधांवर काय परिणाम होणार?
पेशावरमधील दूतावास बंद झाल्यामुळे पाकिस्तानसोबतचे संबंध संपणार का? या प्रश्नावर अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे. "पेशावरमधील कार्यालय बंद होणे म्हणजे संबंध तोडणे नव्हे. इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील अमेरिकन दूतावास पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहतील. खैबर पख्तूनख्वाच्या लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद कायम ठेवू," असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.