होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:06 IST2026-05-06T10:05:56+5:302026-05-06T10:06:13+5:30
US Flying Gas Station Missing : अमेरिकन हवाई दलाचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' (KC-135) कतारजवळ रडारवरून गायब झाले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
अरबी समुद्रात आणि पर्शियन आखातावर उड्डाण करत असताना अमेरिकन हवाई दलाचे एक महत्त्वाचे विमान, KC-135 Stratotanker, बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या विमानाने '७७००' हा आंतरराष्ट्रीय संकटकालीन संदेश पाठवला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रडारवरून गायब झाले. या घटनेमुळे आखाती देशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
'फ्लाईंग गॅस स्टेशन' म्हणून ओळखले जाणारे हे विमान संयुक्त अरब अमिरातीमधील अल धफरा एअरबेसवरून निघाले होते. कतारच्या हवाई हद्दीजवळ असताना विमानाने तातडीने आणीबाणीचा संदेश दिला. फ्लाईट ट्रॅकिंग डेटा दर्शवतो की, विमानाने खाली उतरण्यापूर्वी काही काळ हवेत वर्तुळाकार घिरट्या घातल्या होत्या. ही हालचाल सहसा विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी किंवा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न करण्यासाठी केली जाते.
संपर्क तुटल्याने गूढ वाढले
'७७००' हा कोड पाठवल्यानंतर सुमारे एक तासाने विमानाचा ट्रान्सपॉन्डर पूर्णपणे बंद झाला. कतारमधील 'अल उदेद' या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावरून दोन हेलिकॉप्टर्स शोध मोहिमेसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप अमेरिकन संरक्षण विभाग किंवा 'सेंटकॉम'कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तणावाच्या वातावरणात घडली घटना
पर्शियन आखात आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी या भागात सध्या प्रचंड भूराजकीय तणाव आहे. काही महिन्यांपूर्वीच इराकजवळ अमेरिकेचे असेच एक विमान कोसळले होते, ज्याची जबाबदारी एका स्थानिक गटाने घेतली होती. मात्र, कतारमधील या घटनेमागे तांत्रिक बिघाड आहे की काही बाह्य हस्तक्षेप, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.