पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:18 IST2026-05-06T07:16:28+5:302026-05-06T07:18:15+5:30
West Bengal Election Post Result Violence: कोलकाता येथील न्यू मार्केट परिसरात टीएमसी युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर.

पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मध्य कोलकात्यातील ऐतिहासिक हॉग मार्केट (न्यू मार्केट) परिसरात मंगळवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या (TMC) युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. "कोलकात्याच्या ऐतिहासिक न्यू मार्केटमध्ये भाजपचे 'परिवर्तन' बुलडोझरसह आले आहे," असा टोला मोइत्रा यांनी लगावला. डेरेक ओब्रायन यांनी असा दावा केला की, पोलिसांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय दलांच्या देखरेखीखाली ही तोडफोड करण्यात आली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मांसाच्या दुकानांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्थानिकांचा वेगळाच दावा; अनधिकृत बांधकामाचा पेच
एकीकडे राजकीय आरोप होत असताना, स्थानिक रहिवासी आणि काही व्यापाऱ्यांनी मात्र टीएमसीचे दावे फेटाळून लावले आहेत. स्थानिकांच्या मते, ज्या वास्तूवर बुलडोझर चालवण्यात आला, ती मुळात एका दुकानदाराकडून बळकावलेली जागा होती आणि तिथे अनधिकृतपणे युनियनचे कार्यालय थाटण्यात आले होते. ज्याला 'मांसाचे दुकान' म्हटले जात आहे, ती जागा प्रत्यक्षात तशी नव्हती, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
Kolkata’s historic New Market. Bengalis revelling in Parivartan. pic.twitter.com/TfW6jJNkgo
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 5, 2026
निवडणूक आयोगाचा 'झिरो टॉलरेंस'चा आदेश
घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक आयोगाने कडक पावले उचलली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निवडणूक पश्चात हिंसाचाराबाबत 'झिरो टॉलरेंस' धोरण राबवण्याचे आदेश दिले आहेत. हिंसाचार भडकवणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले असून, न्यू मार्केट परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.