दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 06:01 IST2026-05-06T05:59:22+5:302026-05-06T06:01:04+5:30
बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवली; पण, विष पोटातून काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने मोठी अडचण झाली.

दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
अहेरी/ एटापल्ली (जि. गडचिरोली) : आरोग्य सुविधेचा दुष्काळ आणि खड्डेमय रस्त्यांचा शाप काय असतो, याचा भयानक अनुभव पुन्हा एकदा एटापल्ली तालुक्यात ४ मे रोजी आला. घरगुती वादातून विष प्राशन केलेल्या एका माउलीला वाचविण्यासाठी तिच्या नातेवाइकांनी चक्क दुचाकीवर आडवे ठेवून सुसाट वेगाने सहा किमी अंतर कापून रुग्णालय गाठले. नंतर ‘लोकमत’चे अहेरी तालुका प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनीही स्वतः रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले; मात्र, जीवन-मृत्यूच्या या संघर्षात अखेर मृत्यू जिंकला!
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दाखवली माणुसकी
मीरा गणेश लेकामी (वय २५, रा. कांदोळी, ता. एटापल्ली) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी-कांदोळी मार्गावर ४ मे रोजी दुपारी १२ वाजता एका दुचाकीवर दोघेजण मीरा लेकामी यांना आडवे पकडून जिवाच्या आकांताने येत होते.
त्याचवेळी समोरून येणारे ‘लोकमत’चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांना हे दृश्य दिसले. त्यांनी पाठलाग करत विचारणा केली असता, महिलेने विष घेतल्याचे समजले. मुधोळकर यांनी तत्काळ सहा बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून डॉक्टरांना सतर्क केले.
रुग्णवाहिकेचा चालक रजेवर, ‘सक्शन’ची नळीही खराब
बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवली; पण, विष पोटातून काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने मोठी अडचण झाली.
यावेळी ‘लोकमत’चे प्रतिनिधी मुधोळकर यांनी रुग्णवाहिकेची चावी द्या, मी त्यांना रुग्णालयात पोहोचवतो, अशी विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी चावी दिली. त्यानंतर मीरा यांना घेऊन मुधोळकर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांतून वाट काढत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्ली रुग्णालयात पोहोचवली. एटापल्ली रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘सक्शन’द्वारे विष बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
दोन चिमुकल्यांना पोरके करून गेली
मृत मीरा यांना दोन चिमुकली मुले आहेत. एक दोन वर्षांचा व दुसरा अवघ्या सहा महिन्यांचा आहे. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे दोन चिमुकले कायमचे पाेरके झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.