पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:33 IST2026-05-06T13:31:56+5:302026-05-06T13:33:03+5:30
Pakistan Alcohol Export : कर्जात बुडालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा मद्य निर्यातीला सुरुवात केली आहे. मरी ब्रूअरीकडून ब्रिटन, जपानला पुरवठा.

पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
प्रचंड परकीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मद्य निर्यातीचा मार्ग स्वीकारला आहे. पाकिस्तानमधील एकमेव स्थानिक कंपनी 'मरी ब्रूअरी' ने एप्रिल २०२६ मध्ये ब्रिटन, जपान, पोर्तुगाल आणि थायलंड यांसारख्या देशांना बीयर आणि इतर मद्य उत्पादने पाठवण्यास सुरुवात केली आहे.
एप्रिल १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी इस्लामिक नियमांचा हवाला देत पाकिस्तानात मद्यविक्री आणि निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर लष्करी शासक झिया उल हक यांनी हे कायदे अधिक कडक केले. मात्र, २०२५ मध्ये पाकिस्तान सरकारने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या बंदीत सवलत दिली. आता ओआयसी या इस्लामिक देशांच्या संघटनेचा भाग नसलेल्या देशांना ही उत्पादने विकली जात आहेत.
अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती
पाकिस्तानवर सध्या १३८ अब्ज डॉलरचे प्रचंड परकीय कर्ज आहे. वित्त वर्ष २०२६ मध्ये पाकिस्तानचे एकूण उत्पन्न ४० अब्ज डॉलर असताना खर्च ५८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ३० अब्ज डॉलर (सुमारे ७५% उत्पन्न) केवळ कर्जाचे व्याज फेडण्यात खर्च होत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता मद्य निर्यातीकडे उत्पन्नाचे एक साधन म्हणून पाहत आहे.
मरी ब्रूअरीची मोठी झेप
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 'नॉन-अल्कोहोलिक' पेये विकणाऱ्या मरी ब्रूअरीने आता जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. १९७७ पूर्वी ही कंपनी भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेला मद्य निर्यात करत असे. आता पुन्हा एकदा युरोप आणि आशियाई देशांमध्ये आपले नेटवर्क विस्तारण्याची योजना कंपनीचे सीईओ इस्फानयार भंडारा यांनी आखली आहे.