Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:36 IST2026-05-06T12:36:14+5:302026-05-06T12:36:43+5:30
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ झालेल्या स्फोटांची संपूर्ण टाइमलाईन

Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, मंगळवारी रात्री अवघ्या तीन तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या स्फोटांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. पहिला धमाका जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर झाला, तर दुसरा स्फोट अमृतसरमधील आर्मी कॅन्टोन्मेंटजवळ झाला. या घटनांनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली असून दहशतवादी कटाच्या कोनातून तपास सुरू करण्यात आला आहे.
धमाक्यांची टाइमलाइन आणि घटनाक्रम
पहिला स्फोट (रात्री ८:०० वाजेच्या सुमारास): जालंधरमधील बीएसएफ पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा भीषण स्फोट झाला. हा धमाका इतका मोठा होता की त्याचा आवाज १ किमीपर्यंत ऐकू आला. यात बीएसएफचा एक एएसआय जखमी झाला असून, स्कूटीचा चक्काचूर झाला आहे. स्फोट पार्सलमध्ये होता की ग्रेनेड हल्ला करण्यात आला, याचा तपास आता सुरू आहे.
दुसरा स्फोट (रात्री १०:५० वाजेच्या सुमारास): जालंधरची घटना ताजी असतानाच अमृतसरच्या आर्मी कॅन्टोन्मेंट परिसरात दुसरा धमाका झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु लष्करी तळाजवळ झालेल्या या स्फोटाने सुरक्षा यंत्रणांच्या झोपा उडवल्या आहेत.
तपासाची चक्रे फिरली; एनआयए मैदानात
या दोन्ही घटनांच्या गांभीर्याने दखल घेत एनआयएचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी पंजाबला रवाना झाले आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले असल्याने गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
सरकारवर टीकेची झोड: "हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न"
या स्फोटांनंतर पंजाबमधील राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी एक्सवर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. रेल्वे लाईन आणि लष्करी तळाजवळ होणारे हे हल्ले म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचे संकट आहे. भगवंत मान सरकार या घटनांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे."
दुसरीकडे, अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनीही राज्य सरकारवर हल्ला चढवला. "संवेदनशील सीमावर्ती राज्य सांभाळण्यात हे सरकार पूर्णपणे अक्षम आणि निष्क्रिय आहे," अशी टीका त्यांनी केली आहे. शंभू, जालंधर आणि आता अमृतसर अशा सलग घटनांमुळे पंजाबचा नागरिक आता दहशतीच्या छायेखाली वावरत असून, यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.