'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:38 IST2026-05-06T15:37:38+5:302026-05-06T15:38:21+5:30
सिंधू जल करारावरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
गेल्या काही काळापासून अंतर्गत संकटात सापडलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला उद्देशून 'युद्ध' आणि 'धमकी'ची भाषा सुरू केली आहे. सिंधू जल करारांतर्गत पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, ती युद्धाची कृती मानली जाईल, असे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले इशाक डार?
परराष्ट्र मंत्रालयात राजदूत आणि राजनैतिक समुदायाला संबोधित करताना इशाक डार यांनी भारतावर 'विनाकारण आक्रमकता' दाखवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "भारताने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला युद्धाची कृती मानून पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी आणि संकल्पाने उत्तर देईल." भारताने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही," मात्र पाकिस्तान अजूनही जुन्याच धोरणांचा अवलंब करताना दिसत आहे.
खोट्या विजयाचा सोहळा!
गेल्या वर्षी भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि इशाक डार यांनी या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले. आपल्या जनतेसमोर अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानी नेते आता भारताच्या विरोधात विष ओकून राष्ट्रवादाची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Pakistan threatens India that it will respond with full might if water flow is stopped
— OsintTV 📺 (@OsintTV) May 6, 2026
"Any attempt to stop or divert the flow of water belonging to Pakistan under the Indus Waters Treaty will be considered as an ACT OF WAR. Any misadventure against Pakistan will be met with… pic.twitter.com/tnr5iHoM72
क्षेत्रीय शांतता धोक्यात असल्याचा आरोप
डार यांनी असाही दावा केला की, गेल्या वर्षीच्या घटनांमुळे हे क्षेत्र विनाशाच्या उंबरठ्यावर आले होते. भारताची कृती ही एक नियोजित रणनीती असून पाकिस्तानवर बिनबुडाचे आरोप करून प्रक्षोभक विधाने केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. क्षेत्रीय शांतता ही द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणात ओलीस ठेवली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भारताने सातत्याने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला घेरले आहे. 'पाणी अडवण्या'च्या धमकीला भारत नेहमीच चोख प्रत्युत्तर देत आला असून, आता पाकिस्तानच्या या नव्या धमकीला नवी दिल्ली कशा प्रकारे उत्तर देते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.