मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:12 IST2026-04-21T19:05:16+5:302026-04-21T19:12:40+5:30
येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची घोर फसवणूक झाली आहे....

माता वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी अत्यंत गलिच्छ खेळ सुरू असल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची घोर फसवणूक झाली आहे.

मंदिरात चांदी म्हणून अर्पण करण्यात आलेले दागिने आणि नाणी प्रत्यक्षात चांदी नसून, चक्क लोखंड आणि अतिशय विषारी अशा 'कॅडमियम' धातूचे मिश्रण असल्याचे सरकारी टांकसाळीच्या (Mint) तपासणीत समोर आले. हा घोटाळा जवळपास ५५० कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.

२० टन साठ्यात केवळ ५-६ टक्केच चांदी! यासंदर्भात 'इटी'ने वृत्त दिले आहे. त्यानुसार, वैष्णो देवी श्राइन बोर्डाने मंदिर परिसरात अर्पण करण्यात आलेली जवळपास २० टन चांदी वितळवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारी टांकसाळीत पाठवली होती. बोर्डाला या साठ्यातून ५०० ते ५५० कोटी रुपयांची शुद्ध चांदी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, हा साठा जेव्हा तपासला गेला, तेव्हा अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.

कारण या २० टन चांदीत, शुद्ध चांदीचे प्रमाण केवळ ५ ते ६ टक्केच निघाले. सोप्या भाषेत सांगायचे तर ७० किलोच्या चांदीच्या लॉटमधून केवळ ३ किलो शुद्ध चांदी मिळाली. ५५० कोटींची चांदी म्हणून जिच्याकडे बघितले जात होते, तिचे मूल्य अवघ्या ३० कोटींवर आले.

टांकसाळ कर्मचाऱ्यांनी धातू वितळवण्यास दिला होता नकार - या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे, या बनावट दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात 'कॅडमियम' वापर करण्यात आला आहे. कॅडमियम हा एक अत्यंत विषारी धातू आहे. तो गरम केल्यावर निघणारा धूर कर्करोगाची शक्यता वाढवतो, तसेच यामुळे फुफ्फुस आणि किडनीलाही इजा पोहोचू शकते, असे म्हटले जाते.

यामुळेच टांकसाळ कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला हे धातू वितळवण्यास नकार दिला होता. अखेर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी २५ लाख रुपयांचे विशेष सेन्सर आणि सुरक्षा उपकरणे खरेदी केल्यानंतर, हे काम सुरू करण्यात आले.

स्थानिक दुकानदारांवर संशय - महत्वाचे म्हणजे, तिरुपती अथवा सिद्धिविनायक सारख्या मोठ्या मंदिरांतही चांदी आदी धातूंच्या वस्तू अर्पण करण्यात येतात. मात्र, तेथे असा प्रकार आढळून आलेला नाही. यामुळे कटरा आणि वैष्णो देवी मार्गावरील स्थानिक दुकानदार आणि ज्वेलर्स भाविकांना चांदीच्या नावाखाली लोखंड आणि कॅडमियम मिश्रित दागिने विकत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, कॅडमियमचे दागिने हुबेहूब चांदीसारखेच दिसतात. यामुळे भाविक सहज जाळ्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते. सरकारी टांकसाळीने यासंदर्भात अनेक वेळा उपराज्यपाल (LG) कार्यालय आणि श्राइन बोर्डाला पत्र लिहून कळवले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

















