पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:01 IST2026-04-21T20:00:59+5:302026-04-21T20:01:37+5:30
१ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे...

पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जगच तेल टंचाईचा सामना करताना दिसत आहे. यातच आता भारत सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. आता देशात चक्क अल्कोहोलवर गाड्या चालवण्याची योजना आखली जात आहे. खरेतर, हा प्लॅन प्रत्यक्षात उतरण्यास काही वर्षे लागू शकतात. मात्र त्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू करण्यात येणार आहे.
काय आहे सरकारचा E85 प्लॅन? -
इथेनॉल-२० (E20) नंतर आता सरकार इथेनॉल-८५ म्हणजेच 'E85' इंधन आणण्याच्या तयारीत आहे. या इंधनामध्ये ८५ टक्के अल्कोहोल आणि केवळ १५ टक्केच पेट्रोलचा समावेश असेल. माध्यमांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, २०१६ मध्येच हा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि आता त्यावर लवकरच मसुदा नियम (Draft Rules) जारी केले जाणार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारातही या इंधनासंदर्भात सकारात्मक सहमती बनली असून प्राथमिक चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे.
इंजिनमध्ये करावे लागणार विशेष बदल -
महत्वाचे म्हणजे, E85 इंधनाचा वापर करण्यासाठी गाड्यांच्या इंजिनमध्ये विशेष बदल करावे लागतील. सामान्य गाड्यांमध्ये हे इंधन वापरल्यास इंजिनला गंज लागणे किंवा सील खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केवळ 'फ्लेक्स फ्युअल व्हेईकल' (FFV) मध्येच याचा वापर करता येईल. इथेनॉलची निर्मिती देशांतर्गत स्तरावर ऊस, गहू आणि इतर धान्यांपासून केली जाते.
१ एप्रिलपासून E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य -
सध्या अमेरिका-इराण संघर्षामुळे 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'मध्ये तेल आणि गॅसची जहाजे अडकली आहेत, यामुळे अनेक देश इंधन टंचाईला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर E85 हे E20 पेक्षा वेगळ्या इंधन श्रेणीत आणले जाईल. १ एप्रिलपासून सर्व राज्यांमध्ये E20 पेट्रोलची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे. पण भविष्यात E85 मुळे भारताचे परकीय तेलावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.