कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:05 IST2026-04-21T20:03:26+5:302026-04-21T20:05:22+5:30
हैदराबादच्या सुलतानपुरात २० हजार रुपये आणि घरगुती वादातून सख्ख्या भावाने पती-पत्नीची हत्या केली.

AI Generated Image
कौटुंबिक वादातून एका मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाची आणि भावजयीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील सुलतानपुरा भागात समोर आली आहे. अवघ्या २० हजार रुपयांचे कर्ज आणि अपत्य नसल्यावरून मारले जाणारे टोमणे, यामुळे चिडलेल्या मोठ्या भावाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृतक पती-पत्नीची ओळख अखिल खान आणि अजमेरी बेगम अशी पटली आहे. आरोपी आदिल आणि त्याचा लहान भाऊ अखिल खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदिलला अपत्य नव्हते, तर लहान भाऊ अखिलला चार मुले होती. या गोष्टीवरून अखिल आणि त्याची पत्नी अजमेरी नेहमी आदिलला टोमणे मारत असत. याचसोबत अखिलने आदिलकडून दोन महिन्यांपूर्वी २० हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत मागायला गेल्यावर दोन्ही भावांमध्ये अनेकदा खडाजंगी होत असे.
रक्ताच्या थारोळ्यात सापडले मृतदेह
सोमवारी झालेल्या वादाचे रूपांतर अखेर भीषण हत्याकांडात झाले. रागाच्या भरात आदिलने धारदार शस्त्राने अखिल आणि अजमेरी बेगम यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच मीर चौक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.
आरोपीचा शोध सुरू
या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी आदिल फरार झाला आहे. साऊथ झोनचे इंचार्ज डीसीपी बी. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात कर्ज आणि घरगुती वादातून हे हत्याकांड घडल्याचे स्पष्ट होत आहे. "आम्हाला संशय आहे की आदिलनेच हे दुहेरी हत्याकांड केले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच त्याला जेरबंद केले जाईल," असेही डीसीपींनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, आरोपीच्या अटकेनंतर या घटनेतील आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.