उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:18 IST2026-04-21T20:16:10+5:302026-04-21T20:18:04+5:30

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Two crore rupees fraud by luring a job as a Deputy Collector; Police arrest | उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक

AI Generated Image

दिगांबर जवादे 

गडचिरोली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी पुणे गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ज्ञानेश्वर वारे (४०, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
             
गडचिरोली येथील एक युवक पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याच कालावधीत ज्ञानेश्वर वारे याच्याशी त्याची ओळख झाली. वारे याने आपण वरिष्ठ अधिकारी व मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचे भासवून, युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलिस उपअधीक्षक पदाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात वारे याने गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने युवकाकडून दोन कोटी रुपये उकळले. मात्र, दोन वर्षे उलटूनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने १९ एप्रिल रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

'सिनेस्टाईल' पाठलाग अन् अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचे लोकेशन तपासले असता तो सुरुवातीला मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची पावले आपल्या दिशेने पडत असल्याची चाहूल लागताच आरोपीने मुंबई सोडून पुण्याकडे पलायन केले. मात्र, गडचिरोली पोलिसांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. पुण्यात सापळा रचून गडचिरोली पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक केली.

अनेक बळी असण्याची शक्यता

दोन कोटींची फसवणूक झाल्याने गडचिरोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वारे याने केवळ या युवकाचीच फसवणूक केली आहे की अशाप्रकारे अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. या कारवाईमुळे नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : नौकरी के नाम पर धोखाधड़ी: युवक से करोड़ों ठगने वाला गिरफ्तार

Web Summary : सरकारी नौकरी का वादा करके एक युवक से ₹2 करोड़ की ठगी की गई। पुलिस ने पीछा कर पुणे में आरोपी को गिरफ्तार किया।

Web Title : Job Racket Busted: Man Arrested for Duping Youth of Millions

Web Summary : A youth was conned out of ₹2 crore with the promise of a government job. Police arrested the accused in Pune after a chase.