‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:48 IST2026-04-21T17:47:27+5:302026-04-21T17:48:21+5:30

Baramati Assembly By Election: अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत तेव्हापासूनच अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र सुनेत्रा पवार यांनी याबाबत अद्याप जाहीररीत्या कुठलंही विधान केलं नव्हतं. दरम्यान, आज पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेवेळी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे मोठं विधान केलं आहे.

Baramati Assembly By Election: 'Like everyone else, I too have doubts about Ajit's accident', Sunetra Pawar's big statement during campaigning | ‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान

‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत तेव्हापासूनच अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी तर या अपघातावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत अद्याप जाहीररीत्या कुठलंही विधान केलं नव्हतं. दरम्यान, आज बारामती विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेवेळी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे मोठं विधान केलं आहे. तसेच या अपघाताबाबत इतरांप्रमाणेच माझ्याही मनात शंका असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

बारामती येथे प्रचारसभेला संबोधित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांच्या विमानाला झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. ज्या शंका तुमच्या मनात आहेत, तशाच त्या माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही निष्पक्ष आणि सखोल तपासाचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणी विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून याबाबत तपास सुरू आहे. मात्र या दुर्घटनेबाबतचं सत्य स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काहीही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखी माझीसुद्धा ठाम भूमिका आहे.

कोणत्याही बाबतीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे तुम्ही मनात कुठलीही शंका आणू नका, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी यावेळी केले. 

Web Title: Baramati Assembly By Election: 'Like everyone else, I too have doubts about Ajit's accident', Sunetra Pawar's big statement during campaigning