Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:37 IST2026-04-21T13:27:18+5:302026-04-21T13:37:21+5:30
Monalisa Pregnancy : कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मोनालिसा प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे.

प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं आहे.

मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोच्चीला पोहोचलेल्या पोलिसांच्या पाच सदस्यीय पथकाला रिकाम्या हाताने परतावं लागलं. कारण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मोनालिसा प्रेग्नेंट असल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश्वर पोलिसांचं पथक फरमान आणि मोनालिसाला ताब्यात घेण्यासाठी कोच्चीला पोहोचलं होतं. मात्र, फरमानने पोलिसांना माहिती दिली की मोनालिसा प्रेग्नेंट आहे आणि या परिस्थितीत ती लगेच प्रवास करण्यास किंवा पोलिसांसमोर हजर राहण्यास असमर्थ आहे.

मानवतावादी दृष्टिकोन आणि कायदेशीर अडचणी लक्षात घेता, मध्य प्रदेश पोलिसांच्या पथकाला सध्या तिथून माघारी फिरावं लागलं आहे. मात्र पोलीस या प्रकरणाची चौकशी नक्कीच करणार आहेत.

हा संपूर्ण वाद मोनालिसाच्या वयावरून सुरू झाला आहे. मुलीच्या वडिलांनी मध्य प्रदेशातील महेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे की, मोनालिसाचे वय अवघे १६ वर्षे आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशीतही मोनालिसा अल्पवयीन असल्याचं आढळलं होतं. याच आधारावर पोलिसांनी फरमानविरुद्ध पोक्सो (POCSO) कायदा, अपहरण आणि SC/ST कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे मोनालिसा भोसलेचा असा दावा आहे की, ती १८ वर्षांची झाली असून तिने स्वतःच्या इच्छेने ११ मार्च रोजी तिरुवनंतपुरममधील एका मंदिरात फरमान खानशी लग्न केलं आहे.

मध्य प्रदेश पोलिसांच्या कारवाईदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फरमानला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने फरमानविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला २० मे पर्यंत स्थगिती दिली आहे. याच न्यायालयाचा आदेश आणि मोनालिसाची प्रकृती यामुळे मध्य प्रदेश पोलीस कोच्चीमध्ये असूनही या जोडप्यावर कारवाई करू शकले नाहीत.

मध्य प्रदेश पोलीस कोच्चीला पोहोचताच मोनालिसाने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि कोच्ची पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली. तिने आरोप केला आहे की, तिला जबरदस्तीने मध्य प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तिला तिच्या पतीसोबत केरळमध्ये सुरक्षित राहायचं आहे.

पोलीस केवळ या जोडप्याचाच शोध घेत नाहीत, तर त्यांना फरमानचा मित्र जोशुआ याचाही शोध आहे. जोशुआवर आरोप आहे की त्याने या जोडप्याला केरळमध्ये लपण्यास, राहण्यास आणि लग्नाची व्यवस्था करण्यास पूर्ण मदत केली आहे.

















