"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:29 IST2026-04-21T13:29:16+5:302026-04-21T13:29:43+5:30
Donald Trump warns Iran: अमेरिका-इराण संघर्षविराम बुधवारी संपणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, पाकिस्तानमधील शांतता चर्चा संकटात सापडली आहे.

"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आता निर्णायक वळणावर आले आहेत. येत्या बुधवारी दोन आठवड्यांचा संघर्षविराम संपत असून, तो पुढे वाढवण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. "जर शांतता करार झाला नाही, तर आम्ही मोठे धमाके करू," असा इशारा ट्रम्प यांनी दिल्याने मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यास इराणने नकार दिल्याचे वृत्त आहे. इराणच्या मते, अमेरिका नाकेबंदी करून आणि अवास्तव अटी लादून चर्चेच्या टेबलाला 'शरणागती'च्या टेबलात बदलण्याचा प्रयत्न करत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा सध्या दोन्ही देशांमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या परिसरात दोन्ही देश लष्करी हालचाली वाढवत असून तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.
ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, त्यांचे प्रतिनिधी चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या सार्वजनिक विधानांचा सूर आणि सुरू असलेली आर्थिक व नौसैनिक नाकेबंदी यामुळे चर्चा यशस्वी होण्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
इराणी अधिकाऱ्यांनी 'द वॉशिंग्टन पोस्ट'शी बोलताना सांगितले की, अमेरिकेची ही 'धमकावण्याची नीती' चर्चेसाठी सर्वात मोठा धोका आहे. संघर्षविराम संपण्यासाठी आता काही तास उरले असून, जग आता ट्रम्प आणि खामेनेई यांच्या पुढील पावलांकडे लक्ष लावून आहे.