Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:53 IST2026-04-21T10:47:35+5:302026-04-21T10:53:32+5:30
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या विमानाला मुद्दाम उशीर केल्याचा आरोप केला आहे.

Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या विमानाला मुद्दाम उशीर केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, भाजपा सरकारने त्यांच्या विमानाला उशीर करण्यासाठी विमानतळावर आपल्या 'निवडक' अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाल्या की, माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटांपर्यंत थांबवून ठेवण्यात आलं. हेमंत सोरेन यांच्या चॉपरसोबतही अगदी असंच घडलं होतं. याशिवाय, त्यांनी असंही सांगितलं की, तृणमूल काँग्रेसला सभांच्या परवानगीसाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. खरदह येथील सभेत त्यांनी आरोप केला की, भाजपाच्या एका नेत्याला निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात आलं आहे आणि तो लोकांच्या अडचणी वाढवत आहे.
"नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
"आम्ही याचा बदला घेऊ"
"आम्हाला या सभेच्या परवानगीसाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी अधिकारी आपल्या मर्जीनुसार निवडले आहेत. माझ्या कार्यक्रमाला उशीर व्हावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक मला रोखलं. ते आम्हाला सभा घेण्याची परवानगी देत नाहीत. एक व्यक्ती आला आहे, जो स्वतःला भाजपाचा मोठा नेता समजतो. मी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखते. त्या व्यक्तीला निवडणुकीच्या काळात ड्युटीवर ठेवलं जातं. ते या जिल्ह्यातील लोकांना त्रास देत आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने याचा बदला घेऊ" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"अटक करण्याचा प्लॅन"
खरदह येथे ममतांनी दावा केला की, भाजपा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी टीएमसी कार्यकर्त्यांवर अमली पदार्थांशी संबंधित खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांना अटक करण्याचा प्लॅन करत आहे. त्यांनी आरोप केला की, जो व्यक्ती येथील इन्चार्ज आहे, तो परवानगी देण्यापूर्वी भाजपाची संमती घेतो. जनता त्यांच्या या अहंकाराला लोकशाही पद्धतीने चोख प्रत्युत्तर देईल. मी प्रशासनातील लोकांना आवाहन करेन की त्यांनी कोणताही भेदभाव न करता काम करावं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला खरदह विधानसभा मतदारसंघातील टीएमसी उमेदवार देवदीप पुरोहित यांना विजयी करण्याचं आवाहन केलं.