चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:15 IST2026-04-21T11:13:30+5:302026-04-21T11:15:36+5:30
US Iran Conflict Marathi: १९ एप्रिल रोजी अमेरिकेच्या नौदलाने इराणचे मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये पकडले. या जहाजामध्ये मिसाईलमध्ये वापरले जाणारी रसायने असल्याचा दावा अमेरिकेच्या खासदाराने केला आहे.

चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
Iran-US War Missile Chemicals: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी इराणसाठी बंद केली आहे. इराणच्या बंदरांची नाकेबंदी केलेली असतानाच अमेरिकेने इराणचे एक जहाज ताब्यात घेतले. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी तोडत हे जहाज इराणच्या बंदराकडे निघाले होते. अमेरिकेच्या नौदलाने ताब्यात घेतलेल्या या जहाजामध्ये मिसाईलसाठी वापरली जाणारी रसायने मिळाली आहेत. ही रसायने चीनने पाठवली होती, असा दावा ट्रम्प यांच्या पक्षाच्या नेत्या आणि अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी केला आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकेतील नेत्या निक्की हेली यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, या आठवड्यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेने इराणचे जहाज पकडले. हे जहाज चीनमधून आले होते आणि इराणकडे जात होते. या जहाजामध्ये मिसाईलसाठी लागणारी रसायने मिळाली आहेत. थांबायला सांगितल्यानंतर जहाजाने थांबण्यास नकार दिला गेला होता.
वस्तुस्थितीकडे जास्त काळ कानाडोळा केला जाऊ शकत नाही. चीन इराणच्या सत्तेला मदत करत असल्याचे आठवण करून देणारी ही घटना घटना आहे, असेही निक्की हेली यांनी म्हटले आहे.
तुस्का जहाज अमेरिकेच्या ताब्यात
निक्की हेली यांनी ज्या जहाजाचा उल्लेख केला आहे, ते तुस्का जहाज इराणचे आहे. इराणच्या जहाज वाहतूक मंत्रालयाचेच हे जहाज असून, अमेरिकेच्या नाकेबंदीला ते धडकले होते. अमेरिकन नौदलाने या जहाजाला थांबण्यास सांगितले होते. पण, जहाज थांबवले नाही. त्यानंतर नौदलाने जहाजाच्या इंजिनवर हल्ला केला होता.
नौदलाच्या हल्ल्यानंतर या जहाजाचा वेग कमी झाला. त्यानंतर नौदलाचे जवान हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरले. त्यानंतर हे जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले. या कारवाईवर इराणने संताप व्यक्त केला. आम्ही उत्तर दिले असते, पण जहाजावर आमचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय असल्याचे इराणने म्हटले आहे.