सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:24 IST2026-04-21T11:10:05+5:302026-04-21T11:24:31+5:30
Mumbai Sleeper Vande Bharat Train: मुंबई ते बंगळुरू मार्गावर धावणाऱ्या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे थांबे कोणते असतील? किती वेळ लागेल? जाणून घ्या...

Vande Bharat Sleeper Train: हावडा ते कामाख्या मार्गावर भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. दुसरी ट्रेन कधी सुरू होणार याबाबत प्रवाशांना उत्सुकता आहे. लवकरच दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचा कयास आहे. मुंबईतून धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.

Mumbai Sleeper Vande Bharat Train: कामाख्या हावडा या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या यशस्वी लाँचिंगनंतर, आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि केएसआर बेंगळुरू दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

बेंगळुरू सेंट्रलचे भाजप खासदार पी. सी. मोहन यांनी या संदर्भात केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना रेल्वेमंत्र्यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी पत्राद्वारे ही महत्त्वाची घोषणा केली. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि केएसआर बेंगळुरू स्थानकांदरम्यान धावणार आहे.

मुंबई ते बंगळुरू मार्गावर धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? कधी सुटणार? कोणते थांबे असणार? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. भारताची दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल. पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी दररोज दोन रेक चालवले जाणार आहेत.

अलीकडील एक रिपोर्टनुसार, मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणारी पहिली स्लीपर ट्रेन पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि वाडी या मार्गावरून जाऊ शकते. कलबुर्गी मार्गाला विशेष पसंती दिली जात आहे. कारण हा मार्ग १,१३६ किलोमीटरचा जवळचा आणि पूर्णपणे विद्युतीकरण झालेला मार्ग आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीचा प्रवास अधिक वेगवान आणि आधुनिक बनवेल. सध्या उद्यान एक्सप्रेससारख्या नियमित ट्रेन मुंबई ते बंगळुरू मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी २२ ते २४ तास लागतात, तर ही नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवासाचा वेळ अंदाजे १३ ते १५ तासांपर्यंत कमी करेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना अत्यंत आधुनिक असणार आहे. यामध्ये एकूण १६ एसी डबे असतील, ज्यात ८२३ प्रवाशांसाठी बसण्याची आणि झोपण्याची सोय असेल. यामध्ये ११ एसी ३-टियर डबे, ४ एसी २-टियर डबे आणि १ एसी फर्स्ट-क्लास डब्याचा समावेश असेल. विशेष म्हणजे, फर्स्ट-क्लास डब्यांमध्ये प्रवाशांसाठी गरम पाण्याच्या शॉवरसारख्या सुविधादेखील उपलब्ध असतील.

सरकारला असा विश्वास आहे की, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे केवळ प्रवासाचा वेगच वाढणार नाही, तर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधाही मिळतील. मुंबई आणि बंगळूरु दरम्यानचा प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी आणि अविस्मरणीय अनुभव असेल.

मुंबई-बंगळूरू वंदे भारत स्लीपर सेवा ही देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर कॉरिडॉर ठरेल. बंगळूरु आणि मुंबई दरम्यान दररोज ट्रेन धावते. ही ट्रेन गुंटकल आणि कलबुर्गीमार्गे जाते. ही ट्रेन ११३६ किमी अंतर कापते आणि आंध्र प्रदेशातील बहुतांश भागांतून जाते. बंगळूरू ते मुंबई प्रवासाला २३ तास ३५ मिनिटे लागतात, परतीच्या प्रवासाला २१ तास ५० मिनिटे लागतात.

एलटीटी-एसएमव्हीबी साप्ताहिक विशेष ट्रेन सुरू आहे. मुंबईहून बंगळूरमार्गे धावणाऱ्या इतर ट्रेनमध्ये तिरुवनंतपुरम एक्सप्रेस (दररोज), एलटीटी-कोयंबतूर एक्सप्रेस (दररोज), दादर-पाँडिचेरी एक्सप्रेस आणि दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेस (दोन्ही आठवड्यातून तीनदा) यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरम एक्सप्रेस ही सर्वांत वेगवान असून, तिला १८ तास ४४ मिनिटे लागतात.

प्रवाशांच्या फिडबॅकनुसार भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेवेत बदलही करत आहे. तसेच २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वे तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रचंड मागणी लक्षात घेता, रेल्वे मंत्रालयाने भविष्यात २६० रेक तयार करण्याची योजना अधिकृतपणे जाहीर केली आहे.

ICF मध्ये ५० रेक बांधले जातील आणि ते अन्य रॅकपेक्षा वेगळे असतील. या रेकमध्ये २४ कोच असतील ज्यात पेंट्री कार असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रकल्प प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, चाचण्या आणि निर्मिती अशा पद्धतीने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई यांच्या तंत्रज्ञान भागीदारांसह राबविला जात आहे.

















