धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:05 IST2026-04-20T15:05:01+5:302026-04-20T15:05:18+5:30
Iran warns US retaliation Hormuz: इराणने अमेरिकेला हॉर्मुझमधील जहाज कारवाईचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. "जहाजावर कुटुंबीय असल्याने आम्ही शांत राहिलो," असे इराणने म्हटले आहे. चीनची प्रतिक्रिया आणि कतारमधील तज्ज्ञांचे मत वाचा सविस्तर.

धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाने केलेल्या कारवाईमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित 'तस्नीम' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने जेव्हा 'एमव्ही तूस्का' जहाजावर हल्ला करून ते ताब्यात घेतले, तेव्हा इराणी लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज होते. मात्र, त्या जहाजावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असल्याने त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन इराणने तात्काळ कारवाई टाळली.
इराणची भूमिका: "बदला नक्की घेणार"
इराणने म्हटले आहे की, "जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होताच, इराणचे लष्कर अमेरिकन कारवाईला योग्य उत्तर देईल." इराणने या घटनेला 'युद्धविरामाचे उल्लंघन' म्हटले असून, या आठवड्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
चीनचा सावध पवित्रा: "तणाव वाढवणे थांबवा"
इराणी जहाज ताब्यात घेतल्याबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले की, "हॉर्मुझमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सर्व बाजूंनी जबाबदारीने वागून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून या जागतिक सागरी मार्गावरील सामान्य वाहतूक पुन्हा सुरू होईल."
तज्ज्ञांचे मत: इराणकडे पर्याय मर्यादित?
कतारमधील तज्ज्ञ राशीद अल-मोहनादी यांच्या मते, इराण जरी कठोर भाषेचा वापर करत असला, तरी सध्या त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत: एकतर थेट युद्ध किंवा चर्चा. इराणला ही चर्चा आपल्या अटींवर करायची आहे, जी सध्या अमेरिकेला मान्य नाही. होर्मुझचा मार्ग काही काळासाठी खुला करणे हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होता, मात्र अमेरिकेने आपली नाकेबंदी न उठवल्याने हा प्रयत्न फसला आहे.