"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:10 IST2026-04-20T16:09:48+5:302026-04-20T16:10:59+5:30

इराणने अमेरिकेवर विश्वासघात आणि सीझफायर उल्लंघनाचा आरोप करत शांती चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

"Whether Biden or Trump, America's behavior is the same"; Iran rejects Zidkar's offer of talks; What is the real reason? | "बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?

"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?

पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना इराणने मोठा सुरुंग लावला आहे. "अमेरिका सध्या केवळ ब्लेम गेम खेळत असून त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे सध्यातरी अमेरिकेसोबत कोणत्याही नवीन चर्चेचा आमचा कोणताही प्लॅन नाही," असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे शांतता प्रस्थापित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

"तुमचं बोलणं आणि करणं वेगळं"

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी एका पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली. बघाई म्हणाले की, "अमेरिका एकीकडे चर्चेचे डेलिगेशन पाठवण्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे युद्धविरामाचे उल्लंघन करतो. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अशा स्थितीत चर्चा करणे निरर्थक आहे."

व्यापारी जहाजावरील हल्ल्याने बिघडलं गणित

इराणने अमेरिकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इराणच्या म्हणण्यानुसार, चर्चेची प्रक्रिया सुरू असतानाच अमेरिकन सैन्याने इराणच्या एका व्यापारी जहाजावर हल्ला केला. हा आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग असून ही कृती युद्धाला खतपाणी घालणारी आहे. याशिवाय, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेली बेकायदेशीर नाकेबंदी ही देखील सीझफायरच्या अटींच्या विरोधात असल्याचे इराणने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या मध्यस्थीलाही यश येईना

इराणने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीद्वारे १० मुद्द्यांचा एक शांतता प्रस्ताव दिला होता. मात्र, अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या. लेबनॉनशी संबंधित करारातूनही अमेरिका मागे हटल्याचा आरोप बघाई यांनी केला आहे. "आम्ही हे सर्व मुद्दे पाकिस्तानला कळवले आहेत, तरीही अमेरिकेच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही," असेही त्यांनी नमूद केले.

"हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर देऊ"

इराणने केवळ चर्चेला नकार दिला नाही, तर इशाराही दिला आहे. "जर अमेरिका किंवा इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या सार्वभौमत्वाला धक्का लावला किंवा हल्ला केला, तर आमचे लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देईल," असे प्रवक्त्यांनी ठणकावून सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनी पूर्वी सुरक्षित होती, पण अमेरिका आणि इस्रायलच्या हस्तक्षेपामुळे तिथली परिस्थिती बिघडल्याचा दावा इराणने केला आहे. जोपर्यंत अमेरिका ठोस पावले उचलून विश्वास निर्माण करत नाही, तोपर्यंत इराण आता चर्चेच्या टेबलावर बसण्यास तयार नाही. यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

Web Title: "Whether Biden or Trump, America's behavior is the same"; Iran rejects Zidkar's offer of talks; What is the real reason?