Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
Updated:April 20, 2026 18:19 IST2026-04-20T18:13:13+5:302026-04-20T18:19:34+5:30
Deepa Bhati : दीपा यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची (UPPCS) अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली.

स्वप्नांना कोणतीही 'एक्सपायरी डेट' नसते हे उत्तर प्रदेशातील दीपा भाटी यांनी संपूर्ण जगासमोर सिद्ध करून दाखवलं आहे. एक सामान्य गृहिणी, ३ मुलांची आई आणि लग्नाच्या १८ वर्षांनंतर जेव्हा एखादी महिला पुन्हा हातात पुस्तकं घेते, तेव्हा समाज अनेकदा प्रोत्साहन देण्याऐवजी प्रश्नच जास्त उपस्थित करतो.
दीपा यांचा निश्चय या प्रश्नांपेक्षा, टोमण्यांपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होता. वयाच्या ४० व्या वर्षी, जिथे लोक करिअरमध्ये स्थैर्य शोधतात, तिथे दीपा यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची (UPPCS) अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली.
दीपा भाटी यांची यशोगाथा केवळ प्रशासकीय अधिकारी बनण्यापुरती मर्यादित नाही, तर ती त्या कोट्यवधी महिलांच्या संघर्षाचे प्रतीक आहे, ज्या संसाराच्या आणि मुलांच्या संगोपनाच्या व्यापात आपली स्वप्नं मागे सोडतात.
नोएडाच्या एका छोट्याशा गावातून थेट अधिकारी होण्यापर्यंतचा हा प्रवास त्याग, संयम आणि अढळ आत्मविश्वासाची साक्ष देतो. मनात जिद्द असेल तर वयाचा आकडा केवळ एक संख्या ठरतो, हे दीपा यांनी सिद्ध केलं आहे.
गौतम बुद्ध नगर (नोएडा) मधील कोंडली बांगर गावच्या रहिवासी असलेल्या दीपा भाटी यांचे आयुष्य अनेक वर्षे एका सामान्य गृहिणीप्रमाणे व्यतीत झालं. कमी वयात लग्न आणि त्यानंतर तीन मुलांची जबाबदारी यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रवास थांबला होता.
केमिस्ट्रीमध्ये पदवी आणि इतिहास विषयात एम.ए. केलं होतं, परंतु घरच्या व्यापांमुळे त्या पुस्तकांपासून दुरावल्या गेल्या होत्या. आर्थिक गरजांसाठी त्यांनी एका खासगी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना ती नोकरीही सोडावी लागली.
जेव्हा दीपा भाटी यांच्या आयुष्यात कठीण काळ सुरू होता, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना प्रशासकीय सेवेची तयारी करण्याचा सल्ला दिला. वयाच्या ४० व्या वर्षी जेव्हा त्यांनी तयारी सुरू केली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
"आता या वयात 'साहेब' बनणार का?" असे टोमणे त्यांना ऐकवले जात. मात्र, दीपा यांनी या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, त्यांची थोरली मुलगी त्यावेळी १२ वीत होती आणि आई-लेक अनेकदा एकत्र बसून अभ्यास करत असत.
तीन मुलांच्या आईसाठी अभ्यासासाठी वेळ काढणं हे मोठं आव्हान होतं. दीपा पहाटे लवकर उठून घरचं सर्व काम उरकायच्या, मुलांना शाळेत पाठवणं आणि कुटुंबाची काळजी घेणं ही त्यांची प्राथमिकता होती.
दुपारी सर्वजण झोपल्यावर किंवा रात्री जेव्हा घरात शांतता असायची, तेव्हा दीपा अभ्यासात मग्न व्हायच्या. त्यांनी कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासचा आधार न घेता 'सेल्फ स्टडी'वर भर दिला.
स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी २०२१ च्या 'यूपी पीसीएस' परीक्षेत १६६ वा रँक मिळवला. दीपा भाटी सध्या सरकारी इंटर कॉलेजमध्ये (GIC) प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आणि यूपी पीसीएस अधिकारी म्हणून समाजाची सेवा करत आहेत.
या यशामुळे लग्नानंतर करिअर संपलं असं मानणाऱ्या सर्व महिलांना एक नवी दिशा मिळाली आहे. दीपा भाटी नेहमी सांगतात की, "जर तुमच्याकडे संयम असेल आणि तुम्ही मेहनतीला घाबरत नसाल, तर यशाच्या मार्गात वय कधीही अडथळा ठरू शकत नाही."