"कपिल शर्मा शो केल्याने लोकप्रियता मिळाली, पण..."; अर्चना पूरण सिंग यांनी व्यक्त केली खंत, काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:18 IST2026-04-20T17:17:45+5:302026-04-20T17:18:36+5:30
अर्चना पूरण सिंग या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री. कपिल शर्मा शोमध्ये दिलखुलास हसण्याने अर्चना पूरन सिंह सर्वांचं मन जिंकतात

"कपिल शर्मा शो केल्याने लोकप्रियता मिळाली, पण..."; अर्चना पूरण सिंग यांनी व्यक्त केली खंत, काय म्हणाल्या?
अर्चना पूरण सिंग या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री. कपिल शर्मा शोमध्ये दिलखुलास हसण्याने अर्चना पूरन सिंह सर्वांचं मन जिंकतात. अर्चना यांनी यांनी १९८७ मध्ये 'जलवा' चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र, या चित्रपटानंतर त्यांना सहाय्यक भूमिकाच मिळत गेल्या. काही चित्रपटांमध्ये त्यांना फक्त आयटम साँग करण्याची संधी मिळाली, तर काही चित्रपटांत त्यांनी आपल्या अचूक कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
कपिल शर्मा शोमुळे चित्रपट सुटले?
२०१९ मध्ये जेव्हा अर्चना पूरण सिंग 'द कपिल शर्मा शो'मध्ये नवजोत सिंह सिद्धू यांच्या जागी जज म्हणून आल्या, तेव्हा त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. मात्र, अर्चना यांच्या मते, या संधीचा त्यांच्या कारकीर्दीवर उलटा परिणाम घडला. News18 ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना म्हणाल्या, "इतकी वर्ष मी चित्रपटांमध्ये काम करू शकले नाही. एकदा मला २५ दिवसांच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला जाण्यासाठी विचारणा झाली होती, पण शोच्या शूटिंगमुळे ते शक्य झाले नाही."
अर्चना पूरण सिंग यांनी पुढे स्पष्ट केले की, जेव्हा हा शो टीव्हीवर प्रसारित व्हायचा, तेव्हा वर्षभरात सुमारे १०० भागांचं शूटिंग करावं लागायचं. या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना इतर कोणत्याही कामासाठी वेळ मिळत नव्हता. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांना नकार दिला आणि वारंवार नकार मिळाल्यामुळे निर्मात्यांनी त्यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारणेच बंद केले.
ओटीटीमुळे मिळाली नवीन संधी
आता अर्चना पूरण सिंग यांना ओटीटीमुळे नवी उमेद मिळाली आहे, कारण 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. त्या म्हणाल्या, "आता हा शो सीझननुसार शूट होतो, ज्यामुळे मला वर्षभर भारतातच राहण्याची गरज नसते. आता मी प्रवास करू शकते आणि इतर प्रोजेक्ट्सचे शूटिंगही करू शकते. म्हणूनच हा शो नेटफ्लिक्सवर येत असल्याचा मला खूप आनंद आहे."
अर्चना पूरण सिंग नुकत्याच 'टोस्टर' या चित्रपटात एका महत्त्वाच्या आणि विनोदी भूमिकेत दिसल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा राजकुमार रावसोबत काम केले आहे.