Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:42 IST2026-04-20T16:42:19+5:302026-04-20T16:42:37+5:30
Udhampur Bus Accident : या भीषण बस अपघातात २१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३१ जण मृत्यूशी झुंज देत आहेत.

Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
निसर्गाच्या कुशीत असलेल्या जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सोमवारी रक्ताचा सडा पडला. रामनगर परिसरातील कोहाटमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात २१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३१ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने केवळ शोकच नाही, तर रस्ते सुरक्षा, ओव्हरस्पीडिंग आणि प्रशासकीय दुर्लक्षाबाबत संतापाची लाट उसळली आहे. या अपघाताचा सविस्तर तपास केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
अपघाताची ती भयानक वेळ
रामपूरहून उधमपूरकडे येणारी बस कोहाट भागातील पुलाजवळ आली असता, एका तीक्ष्ण वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक लोकांच्या मते, हा परिसर आधीच 'दुर्घटना क्षेत्र' म्हणून ओळखला जातो, पण प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
८ चालान असूनही बस रस्त्यावर कशी?
तपासातील सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे, ज्या बसचा अपघात झाला तिचे रेकॉर्ड अत्यंत खराब होते. या बसवर यापूर्वीच ओव्हरलोडिंग आणि ओव्हरस्पीडिंगचे तब्बल ८ चालान लावण्यात आले होते. इतके गुन्हे नोंद असतानाही ही बस बिनदिक्कतपणे प्रवाशांची वाहतूक कशी करत होती? हा प्रश्न आता वाहतूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
काय असू शकतात अपघाताची कारणे?
धोकादायक वळण: कोहाट भागातील पुलाजवळील वळण अत्यंत धोकादायक आहे. येथे अनेकवेळा अपघात झाले असूनही तिथे साधे इशाऱ्याचे फलक लावण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही.
तांत्रिक बिघाड: प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बसचे टायर फुटले असावे, ज्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने दरीत कोसळली.
ओव्हरलोडिंग: बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ५० हून अधिक प्रवासी होते. पहाडी रस्त्यांवर बसचे संतुलन बिघडण्यास हे एक मोठे कारण ठरले.
प्रशासकीय हलगर्जीपणा: 'ब्लॅक स्पॉट' माहीत असूनही रस्ता रुंदीकरण किंवा सुरक्षा कठडे बसवण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
रेस्क्यू ऑपरेशन आणि मृतांचा आकडा
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.