मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:19 IST2026-04-20T15:19:10+5:302026-04-20T15:19:10+5:30
Pachpadra Refinery fire news: पचपदरा रिफायनरीला भीषण आग! उद्या PM मोदींच्या हस्ते होणार होते उद्घाटन; राजस्थानमध्ये मोठी खळबळ.

मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
Rajasthan Refinery Fire: राजस्थानच्या पचपदरा येथील बहुप्रतिक्षित रिफायनरीमध्ये सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा उद्याच, २१ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिफायनरीचे औपचारिक उद्घाटन होणार होते. या आगीमुळे रिफायनरीचे मोठे नुकसान झाले असून उद्याच्या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या एका मुख्य प्रोसेसिंग युनिटमध्ये ही आग लागली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, धुराचे काळे लोट सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतर युनिट्समध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ही आग शॉट सर्किटमुळे लागली की यात घातपाताचा काही संबंध आहे, याचा तपास तांत्रिक टीम आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
#WATCH | Rajasthan: Fire broke out at Refinery-cum-Petrochemical Complex at Pachpadra in Balotra. Firefighters have arrived at the refinery to control the fire. More details awaited. pic.twitter.com/Mplsmt4cj2
— ANI (@ANI) April 20, 2026
उद्घाटन सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अवघ्या २४ तास आधी ही घटना घडल्याने प्रशासन हादरले आहे. उद्घाटनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती, तरीही ही आग लागल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. रिफायनरी व्यवस्थापनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून, नुकसानीचा आढावा घेतल्यानंतरच उद्याच्या कार्यक्रमाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.