Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:45 IST2026-04-21T11:44:59+5:302026-04-21T11:45:54+5:30
रॅपिडोवरून प्रवास केल्यानंतर एका ड्रायव्हरने महिला प्रवाशाला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप झाला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
ऑनलाईन कॅब आणि बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये समोर आली आहे. रॅपिडोवरून प्रवास केल्यानंतर एका ड्रायव्हरने महिला प्रवाशाला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप झाला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
अनुष्का नावाच्या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हा संपूर्ण संतापजनक प्रकार उघडकीस आणला. तिने तिच्या राइडची एक छोटी व्हिडिओ क्लिप आणि व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तिने उपरोधिकपणे लिहिलं की, "रॅपिडो बाईक बुक करते, काय होणार आहे?" आणि पुढच्याच क्षणी कॅप्शन येतं, "असं झालं." ही ओळ तिच्या संपूर्ण वाईट अनुभवाची झलक देतं.
"तू क्यूट दिसत होतीस"
शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, राईड संपल्यानंतर ड्रायव्हरने तरुणीला मेसेज केला. त्याने लिहिलं, "ओळखलं नाही का? आत्ताच तर सोडून आलो." जेव्हा अनुष्काने विचारलं की तो तोच रायडर आहे का, तेव्हा त्याने होकार दिला. यानंतर संवादाचा सूर बदलला. ड्रायव्हरने तिची प्रशंसा करताना म्हटलं की, "तू खूप क्यूट दिसत होतीस आणि ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये तू खूपच छान दिसत होतीस."
"तू एकटीच राहतेस का?"
विषय इथेच थांबला नाही. रॅपिडो ड्रायव्हरने तरुणाली तिचं वय विचारलं आणि तू एकटीच राहतेस का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता भेटण्याचा प्रस्तावही ठेवला. असे पर्सनल आणि अस्वस्थ करणारे मेसेज मिळाल्यानंतर अनुष्काने तातडीने ड्रायव्हरला ब्लॉक केलं.
रॅपिडोची प्रतिक्रिया
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रॅपिडो कंपनीने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात ड्रायव्हरचं हे वर्तन "अनैतिक" आणि "पूर्णपणे अस्वीकार्य" असल्याचं म्हटलं असून सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे.
सध्या ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून युजर्स सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. विशेषतः ग्राहकांच्या पर्सनल माहितीच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सोयींसोबतच सुरक्षा किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने अधोरेखित केलं आहे.