MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:20 IST2026-04-21T12:19:16+5:302026-04-21T12:20:04+5:30
गृहनिर्माण विभागाच्या आदेशाला म्हाडाची केराची टोपली; कामगारांमध्ये तीव्र नाराजी

MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: गिरणी कामगारांच्या २ हजार ५२१ घरांची सोडत (लॉटरी) काढण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत म्हाडाला देण्यात आले होते. मात्र, म्हाडाने अद्याप याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. घरांच्या लॉटरीची तारीख अद्याप जाहीर न केल्याने गिरणी कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गिरणी कामगारांच्या घराबाबत विधिमंडळात १३ मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. गृहनिर्माण विभागाने या बैठकीचे इतिवृत्त ६ एप्रिलला प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, या बैठकीत गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे आदेश देतानाच पनवेल - कोनमधील २ हजार ५२१ घरांची लॉटरी काढा, असेही म्हाडाला निर्देश देण्यात आले होते.
निर्णय कागदावर नको
सरकारचे निर्णय कागदावरच राहू नयेत. न्यू ग्रेट मिल, बॉम्बे डाइंग गिरण्याच्या जागेवर बांधलेल्या घरांची लॉटरी जाहीर करून पात्र कामगारांना दिलासा द्यावा. ज्या गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घरे हवी आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून मुंबईतच घरे देण्यावर भर द्यावा, असे गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी सांगितले.
प्रतिसाद मिळेना
लॉटरीसाठी गिरणी कामगारांच्या वारसांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सातत्याने विचारणा केली आहे. मात्र, मुंबई मंडळाकडून वारसांना काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे तेजस कुंभार यांनी सांगितले. गृहनिर्माण विभागाने स्थापन केलेल्या समितीमध्ये गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही आहे. म्हणजे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य गिरणी कामगारांपर्यंत न्याय पोहोचू शकेल, असे संघटनेचे सेक्रेटरी विठ्ठल चव्हाण यांनी सांगितले.
गृहनिर्माण विभागाचे काय होते आदेश?
- रायगड जिल्ह्यातील २,५२१ घरांची डागडुजी ‘एमएमआरडीए’ने करावी आणि दरम्यानच्या कालावधीत म्हाडाने या घरांची लॉटरी काढावी.
- ‘एनटीसी’च्या सहा गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची शक्यता तपासावी.
- बोरिवली येथील खटाव मिल आणि इतर उपलब्ध जागांवर घरे उभारण्याबाबत तपासणी करावी.
- टाटा मिल व नायगाव येथील मिल जागांवर घरबांधणीसाठी क्षमता तपासावी.
- ‘एनटीसी’कडील उपलब्ध जमिनीची माहिती घेऊन त्या जमिनीवर घरांचा प्रस्ताव तयार करावा.
- स्वदेशी मिलच्या जागेवर ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर घरे देता येतील का, याची तपासणी करावी.