येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:25 IST2026-04-21T16:24:02+5:302026-04-21T16:25:04+5:30
Donald Trump US-Iran Peace Talks: अमेरिका आणि इराणमधील संघर्षविराम संपण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये मोठी शांतता चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वतः या बैठकीत सहभागी होऊ शकतात.

येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
अमेरिका आणि इराणमधील दोन आठवड्यांचा संघर्षविराम बुधवारी संपत असताना, जगाचे लक्ष इस्लामाबादकडे लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या चर्चेत प्रत्यक्ष हजर राहणार की ऑनलाइन जोडले जाणार, हे इराणच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स बुधवारीच पाकिस्तानमध्ये दाखल होत आहेत.
चर्चेला बसण्यापूर्वी अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या इराणी जहाजावरील कर्मचाऱ्यांची त्वरित सुटका करावी, अशी अट इराणने घातली आहे. इराणकडे अण्वस्त्रे विकसित करण्याची साधने असू नयेत आणि त्यांनी समृद्ध युरेनियम सोपवावे, यावर ट्रम्प ठाम आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की अटी न मानल्यास इराणचे वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त केले जातील. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपल्या नियंत्रणाचा वापर करून इराण आर्थिक निर्बंधांमध्ये सवलत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त
या ऐतिहासिक चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये २०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जेडी व्हॅन्स यांच्यासोबत ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर हे देखील उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेची अनेक लष्करी विमाने आधीच पाकिस्तानात दाखल झाली आहेत.