"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:54 IST2026-04-21T16:49:03+5:302026-04-21T16:54:31+5:30

Supriya sule speech in Baramati: बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या.   

"This day and this time should not come to any sister", Supriya Sule gets emotional at campaign rally remembering Ajit Pawar | "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 

"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 

"वहिनींना (सुनेत्रा पवार) साथ द्या, ही विनंती करायला आले आहे. हा दिवस आणि ही वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये", असे सांगताना खासदार सुप्रिया सुळेंचा कंठ दाटून आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. यासभेत बोलताना सुप्रिया सुळेंनी अपघाताच्या दिवशीचा प्रसंग सांगितला. 
 
सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मला आजही तो दिवस आठवतो, मी सकाळी फिरत होते. ८.४०ची ती वेळ होती आणि पार्थचा मला कॉल आला. अनेकवेळा पार्थ आणि मी कॉलवर बोलत असतो. मी म्हटलं इतक्या सकाळी काय? तो मला म्हणाला, डॅडीचं प्लेन पडलंय. मी म्हणाले, काहीपण बोलू नकोस. मला म्हणाला आत्या जरा ऐका माझं डॅडीचं प्लेन पडलं."

"मी पार्थला म्हणाले, काही बोलू नको, नीट चेक कर"

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, "मी त्याला बोलले की, डॅडी त्या प्लेनमध्ये आहेत, कशावरून? काही तरी बोलू नको. नीट चेक कर. एका मोबाईलवरून तो माझ्याशी बोलत होता आणि दुसऱ्या मोबाईलवरून तो मुसळेंशी बोलत होता. मुसळे, किरण गुजर हे तिथे (अपघाताच्या ठिकाणी) होते. ते पार्थला व्हिडीओ कॉल करून घटनास्थळाचा व्हिडीओ दाखवत होते", असा प्रसंग सुप्रिया सुळेंनी सभेत सांगितला. 

"आजही डोळे बंद केले की वाटतं काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की असा दिवस आपल्यावर आला. आजही माझा विश्वास बसत नाही. ते प्लेन बघण्याची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. पार्थ म्हणाला, ते विमान बघायचं, माझी आणि वहिनींची हिंमतच झाली नाही", असे सांगताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. 

'बारामतीकरांनी एकमेकांना शब्द दिला पाहिजे'

"मला अपेक्षा होती की, कदाचित अजितदादा त्या विमानामध्ये नसेलच. असला तरीही अजितदादा त्यातून बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण, झालं ते झालं. आपण एक शब्द बारामतीकरांनी एकमेकांना दिला पाहिजे की, अजितदादांची जी स्वप्ने आहेत, आपण सगळे एकत्र मिळून पूर्ण करूयात", अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.  

"मी वहिनींना शब्द देते" 

"मी स्वतः महाविकास आघाडीच्या वतीने सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि माझे सगळे सहकारी यांच्यावतीने वहिनींना शब्द देते की, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता, मतदार ताकदीने त्यांच्यासोबत उभे राहतील", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Web Title : सुप्रिया सुले अजित पवार को याद कर भावुक हुईं।

Web Summary : सुप्रिया सुले ने अजित पवार के विमान दुर्घटना के दिन को याद करते हुए अविश्वास और दर्द व्यक्त किया। उन्होंने महा विकास अघाड़ी की ओर से सुनेत्रा पवार को समर्थन देने और अजित पवार के सपनों को पूरा करने का वादा किया।

Web Title : Supriya Sule gets emotional remembering Ajit Pawar at campaign rally.

Web Summary : Supriya Sule recounted the day of Ajit Pawar's plane accident, expressing disbelief and pain. She pledged support to Sunetra Pawar on behalf of the Maha Vikas Aghadi, promising to fulfill Ajit Pawar's dreams.