डोळे जळजळतायत, लाल होतायत? उन्हाळ्यातील मोठा इशारा ! जाणून घ्या डोळे थंड आणि निरोगी ठेवण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:38 IST2026-04-21T20:31:43+5:302026-04-21T20:38:18+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात मोठी वाढ होत असून, त्याचा परिणाम डोळ्यांवरही जाणवत आहे. उष्ण वारे, धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणे, जळजळ, लालसरपणा, तसेच कोरडेपणा यासारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या त्रासाचा अधिक सामना करावा लागत आहे. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

डोळ्यांची आग होत असेल तर हे करा : डोळ्यांत जळजळ होत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. डोळ्यांना विश्रांती देणे आणि मोबाइल, संगणकाचा वापर कमी करणे फायदेशीर ठरते.

उन्हात निघताना गॉगल्सचा वापर करा : सनग्लासेस (गॉगल्स) वापरल्याने सूर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. धूळ आणि गरम वाऱ्याचा त्रासही कमी होतो. मात्र, सनग्लासेस वापरताना ते दर्जेदार असणे महत्त्वाचे आहे.

उन्हात बाहेर पडणे टाळा : दुपारी ११ ते ४ या वेळेत सूर्याची तीव्रता अधिक असते. शक्यतो या वेळेत बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.

वेळोवेळी डोळे पाण्याने धुवा : डोळ्यांमध्ये साचलेली धूळ आणि घाण काढण्यासाठी वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

झोप पूर्णवेळ घ्या : उन्हाळ्यात शरीरासोबत डोळ्यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे असते. दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. अपुरी झोप असल्यास डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि लालसरपणा वाढू शकतो. शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा, डोळ्यांची सातत्याने उघड झाप करत राहणेही महत्त्वाचे आहे.