गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:55 IST2026-04-19T14:51:03+5:302026-04-19T14:55:57+5:30

गौतम अदानी यांनी या प्रकल्पासाठी MHADA सोबत हातमिळवणी केली आहे.

Motilal Nagar Redevelopment Project: मुंबईतील मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या यादीत आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडली आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर रीडेव्हलपमेंट प्रकल्पाची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे. सुमारे १४३ एकर क्षेत्रफळ असलेला हा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठ्या रीडेव्हलपमेंट योजनांपैकी एक मानला जात आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या मास्टर प्लॅननुसार, या प्रकल्पावर १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे. या माध्यमातून हजारो कुटुंबांना आधुनिक सुविधा असलेली घरे उपलब्ध होणार आहेत.

मोतीलाल नगर प्रकल्पासाठी अदानी रियल्टीने यशस्वी बोली लावली. हा प्रकल्प कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (C&DA) मॉडेल अंतर्गत राबवण्यात येणार आहे. यामध्ये दोन प्रमुख घटक असतील. पहिला- पुनर्वसन आणि दुसरा- फ्री-सेल. या माध्यमातून परिसराचा मोठ्या प्रमाणात आधुनिक विकास केला जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ३,७०२ पात्र रहिवाशांना सुमारे १,६०० चौरस फूट कार्पेट एरियाचे मोफत फ्लॅट, ३२८ व्यावसायिक युनिट्सना सुमारे ९८७ चौरस फूट जागा आणि १,६०० झोपडपट्टीधारकांना सुमारे ३०० चौरस फूट घरे मिळतील.

या प्रकल्पामुळे MHADA कडेही मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण साठा उपलब्ध होणार असून, भविष्यातील घरकुल योजनांना चालना मिळणार आहे. MHADA चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष संजीव जायसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पावर अंदाजे १ लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होऊ शकते. तसेच, पुनर्वसनाशी संबंधित कामे पुढील ७ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गौतम अदानी यांनी अलीकडेच पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९२.६ अब्ज डॉलर आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती ९०.८ अब्ज डॉलर इतकी असून, अदानी यांनी त्यांना मागे टाकले आहे.