"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:31 IST2026-04-19T15:30:18+5:302026-04-19T15:31:24+5:30
"लोकसभेत आमचे ३७.९% महिला सदस्य आहेत, तर राज्यसभेत ४६% महिला सदस्य आहेत. यामुळे महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि टीएमसीसह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवारी 'एक्स'वर पोस्ट करत, "पंतप्रधानांनी हा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याऐवजी देशाची दिशाभूल करण्याचा मार्ग निवडला, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तृणमूल काँग्रेस (TMC) नेहमीच महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे समर्थन करते. आमच्या पक्षात निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोकसभेत आमचे ३७.९% महिला सदस्य आहेत, तर राज्यसभेत ४६% महिला सदस्य आहेत. यामुळे महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
"हा संघराज्यीय लोकशाहीवरील हल्ला" -
ममता बॅनर्जी यांनी परिसीमन प्रक्रियेवरही तीव्र आक्षेप घेतला. मोदी सरकार आपले हितसंबंध साधण्यासाठी महिलांना ढाल म्हणून पुढे करत आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील बदलांना, देशाच्या विभाजनाला आणि इतर राज्यांच्या किंतीवर भाजपशासित राज्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय सीमांच्या फेररचनेला तीव्र विरोध करत आहोत. हा संघराज्यीय लोकशाहीवरील हल्ला आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
"विधेयक सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर होऊनही ३ वर्षे का थांबले?" -
तसेच, हे विधेयक सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर होऊनही ३ वर्षे का थांबले? आणि निवडणुकांच्या तोंडावरच घाई का? ते मतदारसंघ पुनर्रचनेशी का जोडले? असे सवाल करत ममतांनी मोदींवर टीका केली.