Maharashtra day 2026 : मोत्याची वेणी-मोत्याचे वेल आणि मोत्याचाच गजरा! पाहा खास मराठमोळा साजश्रृंगार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 18:22 IST2026-04-30T18:13:01+5:302026-04-30T18:22:34+5:30

best pearl hair accessories for Maharashtra Day look : hairstyle ideas with pearl accessories : फक्त नथच नाही, तर 'हे' मोत्यांचे दागिनेही आहेत मराठमोळ्या सौंदर्याची ओळख, मोत्यांचा शाही थाटमाट...

महाराष्ट्र दिन हा आपल्या मराठमोळ्या परंपरा, संस्कृती आणि सौंदर्याची झलक दाखवण्याचा खास दिवस. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर बिंदी यांसोबतच केसांची सजावटही तितकीच महत्त्वाची ठरते. यामध्ये मोत्यांचे दागिने एक वेगळाच रॉयल आणि एलिगंट टच देतात. मोत्याचा गजरा, मोत्याची वेणी, मोत्याचा वेल अशा पारंपरिक हेअर ज्वेलरीमुळे साधा लूकही उठून दिसतो आणि व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच मोहकता येते.

'महाराष्ट्र दिन' या विशेष दिनी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी आपण नऊवारी साडी आणि नथ तर घालतोच, पण महिलांच्या सौंदर्यात खरी भर घालतो तो म्हणजे केसांचा पारंपरिक साज...

मराठमोळ्या संस्कृतीत केसांची सजावट केवळ गजरा, फुले लावून पूर्ण होत नाही, तर त्यात मोत्यांच्या अलंकारांचा मोलाचा वाटा असतो. मग तो नाजूक मोत्याचा गजरा असो, केसांवर डौलदारपणे फिरणारी मोत्याची वेणी असो किंवा कानापासून केसांपर्यंत जाणारा मोत्याचा वेल! हे दागिने केवळ केसांची शोभा वाढवत नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजेशाही थाटाची आठवण करून देतात.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्ही मोत्यांच्या या दागिन्यांनी तुमचा लूक कसा 'क्लासिक' आणि 'रॉयल' बनवू शकता ते पाहूयात.

नैसर्गिक फुलांचा गजरा काही तासांतच कोमेजून जातो, पण मोत्याचा गजरा दिवसभर तसाच टवटवीत आणि आकर्षक राहतो. नऊवारी किंवा पैठणी साडीवर हा गजरा केसांत मळाला की अगदी सुंदर दिसतो. मोत्यांचा गजरा आजकालच्या लग्नसराईत आणि सणासुदीला खूप लोकप्रिय ठरत आहे. साध्या आणि सोबर लूकसाठी अंबाड्याभोवती एक पदरी मोत्याची माळ गुंडाळली जाते. यासोबतच, मोत्यांच्या अनेक माळा एकत्र गुंफलेल्या असतात, ज्यामुळे अंबाडा अधिक भरगच्च आणि सुंदर दिसतो. काही गजऱ्यांमध्ये मोत्यांसोबतच मध्ये मध्ये कुंदन किंवा लहान नाजूक खड्यांचे काम असते, जे अधिक देखणे दिसते.

लांब सडक वेणीवर लावण्यासाठी मोत्यांचे फूल किंवा सलग मोत्यांची माळ म्हणजे 'मोत्याची वेणी'. हे दागिने नऊवारी साडीवर अधिक जास्त शोभून दिसतात. मोत्याची वेणी ही प्रामुख्याने लांब केसांच्या केशरचनेसाठी वापरली जाते. मोत्यांच्या अनेक माळा एकमेकांना समांतर जोडलेल्या असतात, ज्या वेणीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लावता येतात. काही वेण्यांमध्ये मधोमध मोत्यांची नाजूक फुले किंवा चकत्या असतात, ज्या वेणीच्या प्रत्येक वळणावर लावल्या जातात. जर तुम्हाला अंबाडा घालायला आवडत नसेल, तर साध्या वेणीला हा दागिना लावून तुम्ही घरबसल्या 'सेलिब्रिटी' लूक मिळवू शकता.

कानातल्या बुगड्या किंवा कुड्यांपासून सुरू होऊन केसांच्या पिनांपर्यंत जाणारा हा 'मोत्याचा वेल' तुमच्या साध्या लूकलाही अधिक सुंदर करतो. कानवेल यामध्ये मोत्यांच्या एकापेक्षा जास्त नाजूक सरी असतात, ज्या एकमेकांना गुंफलेल्या असतात. काही वेलींच्या मध्यभागी किंवा शेवटी लहान सोनेरी पदक किंवा रंगीत खड्यांचे काम असते, जे कानाच्या जवळ अधिक उठून दिसते. हा दागिना नऊवारी साडी आणि त्यावरील चंद्रकोर टिकलीवर अतिशय शोभून दिसतो. तुम्ही अंबाडा घातला असो किंवा केस मोकळे सोडले असोत, मोत्याचा वेल दोन्ही प्रकारच्या केशरचनांवर फिट बसतो.

अंबाड्याच्या मधोमध लावली जाणारी मोत्याची मोठी पिन किंवा सोन्या-मोत्याची चंद्रकोर ही केशरचनेला सुंदर आणि आकर्षक लूक देते. अंबाडा पिन ही अंबाड्याच्या अगदी मधोमध लावली जाते, जी लांबूनही लक्ष वेधून घेते. सोन्याच्या मुलाम्यामध्ये जडवलेले मोती आणि मध्यभागी असलेला एखादा लाल खडा या दागिन्याला अधिक उठाव देतो. काही पिन्सच्या खाली लहान मोत्यांचे झुमके किंवा लड असतात, जे डोक्याच्या हालचालीनुसार हलतात आणि सुंदर दिसतात.

मोत्याची शाही खोपा पिन हा दागिन्यांचा असा प्रकार आहे जो तुमच्या केशरचनेला एका क्षणात राजेशाही लूक देतो. ही पिन विशेषतः केसांचा खोपा किंवा मोठ्या अंबाड्यावर लावली जाते. ही पिन आकाराने मोठी आणि ठसठशीत असल्याने, केसांचा आंबाडा किंवा खोपा घातल्यावर अगदी बरोबर मध्यभागी किंवा खोप्याच्या वर लावली जाते. खोप्यावर अनेकदा मोत्यांपासून बनवलेली फुले, पाने किंवा मोराची नक्षी असते, जी आपल्याला अगदी पारंपरिक लूक देते.