पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:45 IST2026-04-30T18:41:44+5:302026-04-30T18:45:47+5:30
हे सर्व अंदाज बनावट आहेत आणि एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयातून आले आहेत," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आलेले सर्व एक्झिट पोल गुरुवारी फेटाळून लावले. तसेच, आपण पुन्हा एकदा "मा, माटी, मानुष" चे सरकार स्थापन करत आहोत, असा विश्वास व्यक्त केला आहे. "हे आकडे केवळ तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी जाहीर करण्यात आले आहेत. हे सर्व अंदाज बनावट आहेत आणि एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयातून आले आहेत," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील दोन्ही टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आलेल्या अधिकांश एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर असे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. निवडणूक विश्लेषकांनीही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपमध्ये लढाई अटितटीची असल्याचे म्हटले आहे. खरेतर, पश्चिम बंंगालच्या २९४ जागांसाठी २३ आणि २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जनतेने उस्फूर्त सहभाग घेत विक्रमी मतदान केले. दोन्ही टप्प्यांतील मतदानाचा आकडा ९२ टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे.
'तृणमूल किती जागा जिंकणार? ममतांची मोठी भविष्यवाणी -
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत 'X' वर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. यात त्यानी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला किती जागा मिळतील? यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. त्या म्हणाल्या, "या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस २२६ हून अधिक जागा जिंकेल."
महत्वाचे म्हणजे, त्यांनी जाहीर केलेला हा आकडा पक्षाच्या गत २१५ जागांपेक्षाही मोठा आहे. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले. एवढेच नाही तर, गरज पडल्यास आपण स्वतः ईव्हीएमचे (EVM) राखण करण्यासाठी येऊ," असेही त्यांनी म्हटले आहे.
असे आहेत एक्झिट पोल्सचे अंदाज -
'मॅटेराइज'च्या (MATERIZE) एक्झिट पोलनुसार, बंगालमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता असून भाजप सरकार स्थापन करू शकते. भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तृणमूल काँग्रेसला १२५ ते १४० जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. तसेच इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, 'पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना १३०-१४० आणि भाजपाला १५०-१६० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.