ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:21 IST2026-04-30T18:21:01+5:302026-04-30T18:21:40+5:30
Oben Rorr Evo Price & Range: १८० किमी रेंज आणि ११० किमी टॉप स्पीड असलेली ओबेन रोर इवो लाँच. ओला रोडस्टर X ला मिळणार मोठी टक्कर.

ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये ओला रोडस्टर X ला आव्हान देण्यासाठी 'ओबेन इलेक्ट्रिक'ने आपली नवीन दमदार इलेक्ट्रिक मोटरसायकल 'रोर इवो' लाँच केली आहे. आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह सज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. ही सवलतीची किंमत पहिल्या १०,००० ग्राहकांसाठीच लागू असेल, त्यानंतर किंमत १.२५ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे.
स्पोर्टी लूक आणि कलर्स:
रोर इवोचे डिझाइन आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक शार्प आणि मॉडर्न आहे. यात सिंगल प्रोजेक्टर हेडलाइट आणि वरच्या बाजूला LED DRL स्ट्रिप देण्यात आली आहे. ही बाईक न्यूट्रॉन ब्लू, पल्स रेड, मॅग्नेटिक ब्लॅक आणि फोटॉन व्हाईट अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बॅटरी आणि रेंजचा धडाका...
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक १८० किमी (IDC रेंज) धावू शकते. यात ३.४ kWh क्षमतेची LFP बॅटरी दिली आहे, जिला IP67 रेटिंग मिळाले असून ती धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने ही बाईक केवळ ९० मिनिटांत ८०% पर्यंत चार्ज होते.
वेगवान परफॉर्मन्स
रोर इवोमध्ये ९kW ची मोटर असून ती २५०Nm टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, ओबेनने या बाईकमध्ये पहिल्यांदाच 'चेन ड्राईव्ह' सिस्टिमचा वापर केला आहे. ही बाईक केवळ ३ सेकंदात ० ते ४० किमी/तास वेग पकडते आणि तिचा टॉप स्पीड ११० किमी प्रतितास आहे.
हायटेक फीचर्स
बाईकमध्ये ५-इंच TFT कन्सोल देण्यात आला आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. याद्वारे रायडर्सना नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि कॉल/मेसेज अलर्ट्स मिळतात. सुरक्षेसाठी यात अँटी-थेफ्ट अलर्ट, फॉल अलर्ट, रिव्हर्स मोड आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारखे फीचर्स आहेत. तसेच ओबेन ॲपद्वारे जिओ-फेन्सिंग आणि रिमोट ट्रॅकिंगची सुविधाही मिळते.