आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 19:42 IST2026-04-30T19:42:03+5:302026-04-30T19:42:37+5:30
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी अमेरिकेला अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला असून, आखाती क्षेत्रात बाहेरील देशांचा हस्तक्षेप यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
पश्चिम आशियातील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी अमेरिकेला अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला असून, आखाती क्षेत्रात बाहेरील देशांचा हस्तक्षेप यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. "आमच्या सामुद्रधुनीत लष्करी हालचाली करणाऱ्या परकीयांसाठी येथे जागा नाही. जे ऐकणार नाहीत, त्यांना थेट समुद्राच्या तळाशी दफन केले जाईल," अशा शब्दांत खामेनेई यांनी थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान दिले आहे.
तेल पुरवठा ठप्प, जगाची कोंडी
मार्च महिन्यापासून इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग बंद केला आहे. या एका निर्णयामुळे जगभरातील तेल पुरवठा विस्कळीत झाला असून जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेने इराणवर घातलेली आर्थिक नाकेबंदी जोपर्यंत हटवली जात नाही, तोपर्यंत हा रस्ता उघडला जाणार नाही, अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मागणी फेटाळून लावल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.
"तुमचे तळ स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत!"
इराणच्या सरकारी टीव्हीवर दिलेल्या संदेशात खामेनेई यांनी अमेरिकेच्या उपस्थितीवर टीकास्त्र सोडले. "होर्मुझच्या सामुद्रधुनीतील असुरक्षिततेचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेची उपस्थिती आहे. अमेरिकेचे लष्करी तळ जर स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत, तर ते इतर देशांना काय सुरक्षा देणार?" असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. या प्रदेशासाठी आता इराण एक नवी सुरक्षा व्यवस्था तयार करत असून, त्यातूनच शांतता येईल असा दावाही त्यांनी केला आहे.
नव्या शस्त्राची दहशत
इराणच्या नौदल प्रमुखांनी नुकत्याच एका प्रगत शस्त्राचा उल्लेख केला होता, ज्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच शक्तीच्या जोरावर खामेनेई यांनी हजारों मैल दूरवरून येणाऱ्या शक्तींना इशारा दिला आहे की, त्यांच्यासाठी आता केवळ समुद्राची खोली उरली आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या तेल व्यापारावर पूर्णपणे निर्बंध लादल्याने इराणवरही प्रचंड दबाव आहे. अशा परिस्थितीत, इराण आता इतर आखाती देशांशी समन्वय साधून स्वतःला या भागातील सर्वात मोठी ताकद म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमधील हा कलगीतुरा आता प्रत्यक्ष युद्धाकडे झुकतो की काय, या भीतीने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.