जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:50 IST2026-04-30T18:49:04+5:302026-04-30T18:50:55+5:30
Oil Import from Hormuz China America Clash : अमेरिकेने होर्मुजमध्ये नाकेबंदी केल्यावर चीन आक्रमक. चीन या मार्गावर नियंत्रण मिळवू शकतो का? भारताच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल?

जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
या जगात तीन महाशक्ती आहेत. एक अमेरिका, दुसरा रशिया आणि तिसरा चीन. हे देश आपल्या शक्तीच्या जोरावर काहीही करू शकतात. या तिन्ही महाशक्तींमध्ये व्यापार, शस्त्रास्त्र स्पर्धा आणि गटा-तटावरून छुपी कारस्थाने सुरुच असतात. अशातच चीनची कच्च्या तेलाची भूक मोठी आहे. जर चीनला हे तेल मिळाले नाही तर चीन इराणच्या मदतीने थेट होर्मुझ स्ट्रेट ताब्यात घेऊ शकतो. असे झाले तर अमेरिकेला माघार घेण्याची वेळ येणार आहे.
पश्चिम आशियातील युद्धात 'होर्मुजची सामुद्रधुनी' युद्धाचा मुख्य आखाडा बनली आहे. इराणने हा मार्ग रोखल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही येथे नाकेबंदी केली आहे. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन प्रचंड भडकला असून, "कोणताही तिसरा देश आम्हाला इराणकडून तेल घेण्यापासून रोखू शकत नाही," असा इशारा चीनने दिला आहे. या तणावामुळे आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे – चीन खरोखरच होर्मुजवर नियंत्रण मिळवू शकतो का?
बंदूक न चालवता चीनचे नियंत्रण?
चीन होर्मुजवर थेट लष्करी ताबा मिळवण्याऐवजी इराणसोबतच्या 'स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप'चा वापर करण्याची शक्यता आहे. सध्या इराणचे ९०% तेल चीनला जाते. त्यामुळे कोणतीही गोळी न झाडता चीन या मार्गावरील ऊर्जा प्रवाहावर आपले वर्चस्व निर्माण करू शकतो. गेल्या काही वर्षांत चीनने अरबी समुद्र आणि आखाती देशांमध्ये आपली नौदलाची ताकद आणि आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे.
युआनचे वर्चस्व आणि जागतिक बाजारपेठ
जर चीनने या मार्गावर नियंत्रण मिळवले, तर जागतिक तेल बाजारात 'अमेरिकन डॉलर'ऐवजी 'चीनी युआन'मध्ये व्यवहार सुरू होऊ शकतात. असे झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेचे समीकरण पूर्णपणे बदलून जाईल. चीन आपल्या मित्र राष्ट्रांसाठी इंधन पुरवठा सुरक्षित करेल, तर प्रतिस्पर्धी देशांसाठी हा मार्ग धोक्याचा ठरेल.
भारताची चिंता का वाढली?
होर्मुजमधील चीनचे वाढते वर्चस्व भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलासाठी आणि गॅससाठी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चीन आणि इराणच्या भागीदारीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास भारतात इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात. अरबी समुद्रात चीनची वाढती उपस्थिती भारताच्या सागरी सुरक्षेसाठी आव्हानात्मक ठरू शकते.